IND vs BAN 1st Test : दोन्ही राहुलची ‘कसोटी’, भारत-बांगलादेश यांच्यात आजपासून पहिला कसोटी सामना | पुढारी

IND vs BAN 1st Test : दोन्ही राहुलची ‘कसोटी’, भारत-बांगलादेश यांच्यात आजपासून पहिला कसोटी सामना

चट्टोग्राम, वृत्तसंस्था : भारत आणि बांगला देश (IND vs BAN) यांच्यातील वन-डे मालिका नुकतीच संपली. यजमान बांगला देशने भारताचा 2-1 असा पराभव करत मालिका विजय साजरा केला. आता बांगला देश संघ कसोटीमध्येदेखील भारताला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना आज (बुधवार, दि. 14 डिसेंबर) पासून चट्टोग्रामच्या झाहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू होणार आहे. वन-डे मालिकेतील चुका टाळून भारत ही कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कारण, या मालिका विजयावरच भारताचा कसोटी चॅम्पियनशिपचा पुढील प्रवास अवलंबून आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे या कसोटीत भारताच्या रनमशिन विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या कसोटी सामन्यात विराट कोहलीला मोठमोठे कारनामे करण्याची नामी संधी आहे; पण संघातील कॉम्बिनेशन्स कशी असावीत, यावरून दोन्ही राहुल अर्थात प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार लोकेश राहुल यांची कसोटी लागणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्याच्या जागी के. एल. राहुल संघाची धुरा सांभाळत आहे. के.एल.सह शुभमन गिलची सलामी निश्चित दिसते; परंतु जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंशिवाय बॉलिंग कॉम्बिनेशन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची डोकेदुखी वाढवत आहे.

भारताकडे पाच वेगवान गोलंदाज आणि चार फिरकीपटूंचा संघात समावेश आहे. तथापि, संघ व्यवस्थापन अनुभवी जोड्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नाही. उनाडकटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी केली असली, तरी शार्दूल ठाकूरच्या अनुभवामुळे त्याला संधी मिळणार आहे. मात्र, फिरकी विभागात दमछाक झाली आहे. रविचंद्रन अश्विन हे पहिले नाव आहे. अक्षर पटेलला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी सौरभ कुमार आणि कुलदीप यादव यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.

भारत बांगला देशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुभमन गिलला सलामीचे स्थान मिळेल; कारण तो बॅकअप सलामीवीर आहे. चेतेश्वर पुजारा विराट कोहलीसह चौथ्या क्रमांकावर आपले 3 क्रमांकाचे स्थान कायम ठेवेल. श्रेयस अय्यरला पाचवा क्रमांक मिळेल. सहाव्या क्रमांकावर आश्चर्यकारक कामगिरी करणारा ऋषभ पंत यष्टीमागे आपले काम सुरूच ठेवेल. याचा अर्थ टीम इंडियासाठी के. एस. भारत हा फक्त बॅकअप पर्याय असेल.

सातव्या क्रमांकापासून ते कठीण होणार आहे. जडेजाशिवाय अश्विन सातव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. मात्र, भारतासमोर फिरकीची कोंडी होत आहे. अक्षर पटेलने उपखंडात चांगली कामगिरी केली आहे. लेफ्ट आर्म स्पिनरसाठी भारत सौरभ कुमारची निवड करू शकतो. बांगला देश ‘अ’ विरुद्ध भारत ‘अ’ संघातर्फे सौरभ कुमार हा दोन सामन्यांत 15 बळी घेऊन सर्वोत्तम गोलंदाज ठरला. संघ व्यवस्थापन उत्तर प्रदेशच्या या फिरकीपटूला त्याचे स्वप्नवत पदार्पण देऊ शकते.

भारताचा कसोटी संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शुभमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.

बांगला देशचा कसोटी संघ : (पहिल्या सामन्यासाठी) – महमुदूल हसन जॉयन, नजमूल होसैन शांतो, मोमिूनल, जाकारी होसैन, यासीर अली, मुश्फिकर रहिम, शाकिब अल हसन, लिटन दास, सोहन, मेहिदी हसन, तज्जूल, तस्किन अहमद, खालेद, इबादत होसैन, शॉरिफुल, रेजौल इस्लाम, अनामुल हक.

आज पहिली कसोटी (IND vs BAN)

सामन्याची वेळ : सकाळी 9 वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क

नोव्हेंबर 2019 मध्ये भारत-बांगला देश यांच्यात अखेरचा कसोटी सामना झाला होता आणि त्यात भारताने एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला होता. उभय संघांमध्ये आतापर्यंत 11 कसोटी सामने झाले आणि बांगला देशला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.

* सचिन तेंडुलकरने भारत-बांगला देश यांच्यातल्या कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने 7 कसोटींत 136.66 च्या सरासरीने 820 धावा केल्या आहेत.

* भारत-बांगला देश यांच्यातल्या कसोटी सामन्यांत सर्वाधिक शतकांचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 5 शतके झळकावली आहेत.

* भारत आणि बांगला देश यांच्यातल्या कसोटी सामन्यांत झहिर खानने सर्वाधिक 31 विकेटस् घेतल्या आहेत. इरफान पठाणने बांगला देशविरुद्ध कसोटीत पाच विकेटस् तीनवेळा घेण्याचा विक्रम केला आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केल्यास राहुल द्रविड यांनी बांगला देशविरुद्ध सर्वाधिक 13 झेल टिपले आहेत.

हेही वाचा…

Back to top button