

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने (Joe Root) पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत नव्या विक्रमाला गवसणी घातली. सामन्याच्या चौथ्या दिवशी फहीम अश्रफची विकेट घेत त्याने कसोटी करिअरमध्ये बळींचे अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर तो कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा फटकावून 50 बळी घेणारा जगातील तिसरा तर इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
रूटचे (Joe Root) नाव आता जॅक कॅलिस आणि स्टीव्ह वॉसारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाले आहे. द. आफ्रिकेचा माजी कसोटीपटू कॅलिस कसोटीत 10,000 हून अधिक धावा आणि 50 बळी घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 166 कसोटीत 45 शतकांसह 13,289 धावा केल्या, तर गोलंदाजीत 292 विकेट्स घेतल्या. 54 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याच्यानंतर या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉचा नंबर लागतो. त्याने 168 कसोटी सामन्यात 10,927 धावा केल्या असून 92 विकेट्सही घेतल्या आहेत. 28 धावांत 5 बळी ही वॉची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा केल्या आहेत, यादरम्यान त्याने 51 शतके झळकावली असून 46 बळी सुद्धा पटकावले आहेत. दुसरीकडे इंग्लंडच्या रुटने केवळ 126 सामन्यांमध्ये ही कामगिरी करून सचिनला मागे टाकले आहे. आतापर्यंतच्या कसोटी क्रिकेटच्या करिअरमध्ये रूटच्या बॅटमधून 10629 धावा आल्या आहेत. यादरम्यान त्याने 28 शतके आणि 55 अर्धशतके झळकावली आहेत. रूटची (Joe Root) कसोटी क्रिकेटमधील सरासरी 49.66 आहे. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 8 धावांत 5 बळी अशी आहे.