

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडने पाकिस्तानचा मुलतान कसोटीत अवघ्या 26 धावांनी पराभव केला असून पाकच्या सलग दुस-या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे. त्यामुळे पाक संघाच्या आयसीसी 'डब्ल्यूटीसी'च्या (ICC WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. पाकच्या पराभवाचा मात्र इंग्लंडपेक्षा भारतीय संघाला जास्त फायदा झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा 'डब्ल्यूटीसी'च्या अंतिम फेरीत पोहचेल अशी आशा निर्माण झाली आहे.
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानच्या विजयाची टक्केवारी 51.85 वरून 46.67 टक्यांवर घसरली आणि आता दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानच्या संघाची विजयाची टक्केवारी केवळ 42.42 टक्के राहिली आहे. सलग दोन सामने गमावल्यामुळे पाकिस्तान गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. त्यांनी अलीकडेच वेस्ट इंडिजचा विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 75 आहे, तर दक्षिण आफ्रिका 60 टक्क्यांसह दुसऱ्या आणि श्रीलंका 53.33 च्या टक्केवारीच्या जोरावर तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर 52.08 च्या विजयी टक्केवारीसह भारतीय संघ चौथ्या आणि इंग्लंडचा संघ 44.44 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर आहे.
या यादीत ऑस्ट्रेलियन संघाने जवळपास अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता कांगारू संघाला आणखी 6 सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी हे सामने जिंकले तर ते अंतिम फेरीत प्रवेश करतील. दरम्यान, भारताला सुद्धा 6 सामने खेळायचे आहेत. जर भारतीय संघाने अगामी मालिकेत बांगलादेशला 2-0 आणि ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत केले तर ते फायनलसाठी आपला दावा मजबूत करतील. त्याचबरोबर द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजयावरही भारताला अवलंबून राहावे लागणार आहे.