FIFA WC Golden Boot : ‘गोल्डन बूट’ची शर्यत झाली रंजक, जाणून घ्या कोण आहेत स्पर्धक? | पुढारी

FIFA WC Golden Boot : 'गोल्डन बूट'ची शर्यत झाली रंजक, जाणून घ्या कोण आहेत स्पर्धक?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये सुरू असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा (FIFA World Cup) अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सेमीफायनलसाठी (FIFA World Cup semifinals) चार संघ ठरले असून यात अर्जेंटिना (argentina), क्रोएशिया (Croatia), फ्रान्स (France) आणि मोरोक्को (morocco) यांचा समावेश आहे. जसजशी स्पर्धेची पुढची फेरी येत आहे तसतशी गोल्डन बूटची शर्यतही रंजक बनली आहे. फ्रान्सचा किलियन एमबाप्पे (kylian mbappe) अव्वल स्थानावर आहे. तर त्याचा संघ सहकारी ऑलिव्हियर गिराड (Olivier Giroud) आणि अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी (lionel messi) हे दोघे एमबाप्पेच्या मागे आहेत. स्पर्धेत सात खेळाडूंनी तीन गोलची नोंद केली. पण उपांत्यपूर्व फेरीनंतर त्या सातजणांपैकी कुणीही गोल्डन बुटच्या शर्यतीत नाहीत. त्यामुळे त्यांना आपआपल्या गोलतक्त्यात भर घालण्याची संधी मिळणार नाही. पण एमबाप्पे, गिराड, मेस्सी हे स्पर्धेत अजून कायम आहेत आणि त्यामुळे त्यांना गोल करण्याची संधी आहे. गोल्डन बुट (FIFA WC Golden Boot) या तिघांपैकी एका मिळणार हे निश्चित.

फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेत या पुरस्कारासाठी दिग्गज खेळाडूंमध्ये चुरस पहायला मिळत आहेत. फ्रान्सचा एमबाप्पे गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने पाच सामन्यांत पाच गोल केले आहेत. रशियात झालेल्या 2018 च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनच्या तुलनेत तो केवळ एक गोल मागे आहे. हॅरीने त्या स्पर्धेत सहा गोल करून गोल्डन बूट पुरस्कार पटकावला होता. एमबाप्पेला त्याचाच जोडीदार ऑलिव्हियर गिराडकडून टक्कर मिळत आहे. गिराडने चार सामने खेळले असून त्याच्या नावावर चार गोलची नोंद झाली आहे. फ्रान्सने उपांत्य फेरी गाठल्यामुळे त्या शर्यतीतील आव्हान कायम आहे. (FIFA WC Golden Boot)

दुसरीकडे, अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीनेही गोल्डन बुटवर आपला दावा केला आहे. तो या शर्यतीत गिराडच्या बरोबरीने आहे. मेस्सीने पाच सामन्यांत चार गोल केले असून त्यापैकी दोन हे पेनल्टीतून त्याच्या खात्यात जमा झाले आहेत. तर दोन गोलसाठी असिस्ट करत स्पर्धेतील अर्जेंटिनाचे आव्हान कायम ठेवण्यात मेस्सीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्रोएशिया विरुद्ध सेमीफायनलचा सामना अर्जेंटिनाने जिंकल्यास मेस्सीकडे अंतिम फेरीचा अजून एक सामना खेळण्याची संधी असेल. त्या सामन्यात मेस्सीने गोल केल्यास तो नक्कीच गोल्डन बुट मिळवेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे. (FIFA WC Golden Boot)

पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे गोल्डन बुटच्या शर्यतीत कुठेच अस्तित्व नाही, पण त्याच्या संघाचा गुणकालो रामोस चौथ्या स्थानावर आहे. तीन सामन्यांत त्याचे तीन गोल झाले आहेत. पोर्तुगालचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे रामोसला गोल्डन बुट मिळणे शक्य नाही. अशीच अवस्था इतर तीन गोल करणा-या रिचर्लिसन (ब्राझील), साका (इंग्लड), अल्वारो मोराटा (स्पेन), एम. रॅशफोर्ड (इंग्लड), सी. गकपो (नेदरलँड), ई. व्हॅलेन्सिया (इक्वेडोर) यांची आहे.

गोल मारणारे खेळाडू (आकडेवारी उपांत्य फेरीपूर्वी पर्यंत)

गोल : खेळाडू
3 : 7
2 : 22
1 : 80

गोलसाठी असिस्ट करणारे खेळाडू

इंग्लंडचा हॅरी केन, पोर्तुगालचा ब्रुनो फर्नांडिस आणि फ्रान्सचा अँटोनी ग्रीझमन या तिघांनी तीन-तीन गोलसाठी असिस्टची भूमिका पार पाडली आहे. परंतु सेमीफायनलपर्यंत फ्रान्सचा एकमेव संघ शिल्लक असल्याने ग्रीझमन तो या शर्यतील आघाडीवर पोहचू शकतो. मेस्सीने दोन गोलमध्ये असिस्ट केले आहे.

असिस्ट गोलची संख्या : खेळाडू (आकडेवारी उपांत्य फेरीपूर्वी पर्यंत)
3 : 3
2 : 16
1 : 72

उपांत्यपूर्व फेरीत मोठे उलटफेर

उपांत्यपूर्व फेरीत मोठे उलटफेर झाले असून यात पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील तसेच ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला पराभव पत्करावा लागला आहे. तर, नेदरलँड आणि इंग्लंड सारख्या बलाढ्य संघांनाही प्रतिस्पर्धी संघांनी धूळ चारून स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच वेळी गतविजेता फ्रान्स, दोन वेळचा विजेता अर्जेंटिना तसेच क्रोएशिया आणि मोरोक्को यांनी अंतिम-4 अर्थात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 13 डिसेंबरला मेस्सीच्या अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियाशी आणि 14 डिसेंबरला फ्रान्स-मोरोक्को आमने-सामने येणार आहेत.

Back to top button