Yassine Bounou : ‘रोनाल्डो’ला रडवणा-या ‘या’ मोरक्कन गोलकीपरचे भारताशी आहे खास नाते! | पुढारी

Yassine Bounou : ‘रोनाल्डो’ला रडवणा-या ‘या’ मोरक्कन गोलकीपरचे भारताशी आहे खास नाते!

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA World Cup) शनिवारी ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) चाहत्यांना मोठा धक्का बसला. अल थुमामा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालवर 1-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. या पराभवासह पोर्तुगाल आणि रोनाल्डोचे वर्ल्ड कप स्पर्धेतील अभियान संपुष्टात आले. मोरोक्कोच्या (Morocco) या मोठ्या विजयाचे श्रेय त्याचा गोलरक्षक यासीन बौनोला (Yassine Bounou) जाते. दिग्गज खेळाडूंना चकवा देणाऱ्या या गोलकीपरचे भारताशीही खास नाते आहे.

Image

मोरक्कन संघाने एकप्रकारे इतिहास रचला. हा संघ उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला. यापूर्वी कोणताही आफ्रिकन देश फिफा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचला नव्हता. सामना संपल्यानंतर रोनाल्डोला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो रडत-रडतच स्टेडियममधून बाहेर पडताना दिसला.

Image

मोरक्कन गोलकीपर यासीन बौनो (Yassine Bounou) सध्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे मैदान गाजवत आहे. स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पण या धडाडीच्या गोलकीपरने भारतातील मैदानही गाजवले आहे हे फार कमी लोकांना माहिती असेल. त्या स्पर्धेत भारतीय क्लब केरळ ब्लास्टर्सचा देखील समावेश होता.

Image

2018 मध्ये भारतात एक मैत्रीपूर्ण स्पर्धा झाली ज्यामध्ये तीन संघ सहभागी झाले होते. केरळ ब्लास्टर्सने स्पर्धेचे यकमानपद भूषवले होते. त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मेलबर्न सिटी एफसी आणि स्पेनचा गिरोना क्लब सहभागी झाले होते. गिरोना हा स्पॅनिश लीग ला लीगामध्ये नवीन क्लब होता. बौनो (Yassine Bounou) याच संघाचा भाग होता.

Image

स्पर्धेतील पहिला सामना मेलबर्न सिटी आणि गिरोना क्लब यांच्यात कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. हा सामना गिरोनाने 6-0 असा जिंकला ज्यामध्ये बौनोची महत्त्वाची भूमिका होती. संघाचा पुढचा सामना केरळ ब्लास्टर्सविरुद्ध होता पण त्या सामन्यात बुनोला विश्रांती देण्यात आली होती.

Image

कतार वर्ल्ड कपच्या अंतिम आठमध्ये पोहोचणारा मोरोक्को हा युरोप किंवा दक्षिण अमेरिकेबाहेरचा एकमेव संघ तर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. याआधी कॅमेरूनने 1990 मध्ये, सेनेगलने 2002 मध्ये आणि घानाने 2010 मध्ये शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले होते, परंतु तीनपैकी एकही संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. उपांत्यपूर्व फेरीतूनच त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला होता.

Back to top button