‘आरसीबी हरली मात्र जेमिसन काहीतरी जिंकला!’ पराभवानंतर मीम्सचा पाऊस | पुढारी

'आरसीबी हरली मात्र जेमिसन काहीतरी जिंकला!' पराभवानंतर मीम्सचा पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क

आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात कोलकाता नाईट रायडर्सने ( केकेआर ) रॉयल चॅलेंजर बेंगलोरला ( आरसीबी ) 9 विकेट आणि 10 षटके राखून मात दिली. या विजयाबरोबरच केकेआरने आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धडाकेबाज सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूला फक्त 92 धावात गाशा गुंडळावा लागलेला आरसीबी टीकेचा धनी झाला.

सोशल मीडियावर आरसीबी पराभूत झाल्या झाल्या मीम्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. अनेक चाहत्यांनी मीम्सच्या सहाय्याने आरसीबीच्या खराब कामगिरीवर टीका केली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र केकेआरच्या आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्या भेदक माऱ्यासमोर आरबीची फलंदाजी पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. रसेलने 9 धावात 3 तर वरुण चक्रवर्तीने 13 धावात 3 विकेट घेतल्या. आरसीबीकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 22 धावा केल्या.

आरसीबीचे 92 धावांचे आव्हान केकेआरने 10 षटकातच पार केले. सलामीवीर शुभमन गिलने 48 तर व्यंकटेश अय्यरने नाबाद 41 धावांची खेळी केली. आरसीबीचा पहिल्याच सामन्यात दारूण पराभव झाल्यामुळे याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली.

एका नेटकऱ्याने आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू कायल जेमिसनचा डगआऊटमध्ये बसलेल्या महिलेशी संवाद साधतानाचा फोटो शेअर करुन ‘आरसीबी हरली असली तरी जेमिसनने काहीतरी जिंकले आहे.’ असे खोचक कॅप्शन दिले.

अशाच प्रकारे अनेक नेटकऱ्यांनी आरसीबीला टार्गेट करत भन्नाट मीम्स शेअर केले. यामार्फत त्यांनी आरसीबीच्या खराब कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली.

Back to top button