विराट कोहलीने टी -२० कर्णधारपद सोडण्याची ‘ही’ आहेत तीन कारणे | पुढारी

विराट कोहलीने टी -२० कर्णधारपद सोडण्याची 'ही' आहेत तीन कारणे

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : गेल्या दीड वर्षात, अशी चर्चा होती की तीन फॉरमॅटसाठी तीन कर्णधार नेमण्यात यावेत परंतु बीसीसीआय त्याला नकार देत आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या जोर धरू लागल्या त्यावेळी बीसीसीआयच्या कोषाध्यक्षांनी हे नाकारले होते.आता मात्र विराट कोहलीच्या ट्विट वरून ही चर्चा सत्यात उतरली आहे.

विराट कोहलीने यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. चर्चा होती की तो विराट व्हाईट बॉल फॉरमॅट (वनडे आणि टी -२०) चे कर्णधारपद सोडेल, पण विराटने सध्या टी -२० चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ विराट कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार राहील.

आपल्या ट्विटरवर लिहिलेल्या पत्रात विराटने टी -२० कर्णधारपद सोडण्यामागील कारण तीन फॉरमॅट मधील कामाचा ताण असल्याचे सांगितले आहे. यामध्ये त्याने म्हटले आहे की, तो गेल्या ५ – ६ वर्षांपासून तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे आता तो स्वतःला वनडे आणि कसोटीत पूर्णपणे कप्तान पदासाठी वेळ देणार आहे.

तथापि विराटने कर्णधारपद सोडण्याची अनेक कारणे होती. त्या कारणामुळे विराटवर दबाव निर्माण झाला आणि नंतर त्याचा परिणाम टी -२० मधील कर्णधारपद सोडण्यावर झाला. चला जाणून घेऊया तीन सर्वात मोठ्या खऱ्या कारणांमुळे विराटवर टी -20 चे कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकला त्यामुळे त्याने हा मोठा निर्णय घेतला.

रोहित शर्माची टी -२० फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी

गेल्या काही वर्षांत रोहित शर्माने कर्णधार म्हणून टी -२० फॉरमॅटमध्ये आपले नेतृत्व गुण सिध्द केले. या वर्षांमध्ये रोहितने आपली फलंदाजीच नव्हे तर कर्णधार नसताना सुध्दा आपली दावेदारी प्रबळ केली. आयपीएल मध्येसुध्दा रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला एकूण पाच विजेतेपद मिळवून दिली आहेत.आणि हा रेकॉर्ड असा होता की ज्यामुळे विराटवर खूप दबाव आणणारा हा एक विक्रम होता. रोहित सुद्धा ३४ वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत निवड समितीच्या एका वर्गाची चर्चा झाली होती की या अनुभवी व्यक्तीला कर्णधारपदाची संधीही मिळावी आणि हा निर्णय लवकरात लवकर लागणे जरूरीचे होते.

विराटला आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकता आले नाही

विराट कोहली गेली अनेक वर्षे टीम इंडियाचे कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मालिका जिंकल्या, पण त्याच्या कर्णधारपदाखाली भारत मर्यादीत षटकांच्या प्रकारात आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकू शकला नाही. आणि या करणामुळे त्याच्यावर सतत दबाव होता व त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. विराटच्या निर्णयाचे हे देखील एक कारण होते. काही दिवसांनी सुरू होणार विश्वचषक स्पर्धेत विराटला विश्वचषक जिंकून आपले पहिले आयसीसी जेतेपद जिंकण्याची चांगली संधी आहे.

विराटच्या फलंदाजीवर परिणाम

गेल्या दोन वर्षांत विराटला आपल्या फलंदाजीत सातत्य राखता आले नाही. २०१९ पासून कोहलीला कसोटीत शतक साजरे करता आलेले नाही. प्रत्येकाला वाटत होते की तीन्ही प्रकारच्या फॉरमॅटमधील कामाच्या ओझ्यामुळे कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम होऊ लागला आहे. आणि या कारणामुळे शेवटी त्याने लिहिलेल्या पत्रात कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

Back to top button