FIFA WC Spain vs Costa Rica : स्पेनने दुबळ्या कोस्टारिकाला ७ - ० ने चिरडले | पुढारी

FIFA WC Spain vs Costa Rica : स्पेनने दुबळ्या कोस्टारिकाला ७ - ० ने चिरडले

दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : फिफा विश्वचषक २०२२ मधील चौथ्या दिवशी ग्रुप ई मधील सामन्यात मातब्बर स्पेनने दुबळ्या कोस्टारिकाला तब्बल ७ – ० अशा गोल फरकाने अक्षरशा: चिरडले. या विजयासह यंदाच्या स्पर्धेतील सर्वात मोठा विजय स्पेनने नोंदवला आहे. हा एक मोठा आणि ऐतिहासिक विजय मानला जात आहे. आता स्पेन २८ नोव्हेंबर जर्मनी विरुद्ध भिडणार आहे. बुधवारीच झालेल्या सामन्यात धक्कादायरित्या जर्मनीने जपानकडून पराभव पत्करला. त्यामुळे पुढील सामना अत्यंत अटीतटीचा पहायला मिळणार यात शंका नाही. तर कोस्टारिका आपला दुसरा सामना जपान विरुद्ध २७ नोव्हेंबर रोजी खेळणार आहे. (FIFA WC Spain vs Costa Rica)

ऐतिहासिक विजय (FIFA WC Spain vs Costa Rica)

स्पेनने कोस्टारिकाला ७ – ० असे पराभूत करत एक ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या पुर्वी स्पेनने १९९८ मध्ये बुल्गेरियाला ६ – १अशा फरकाने पराभूत केले होते. तर कोस्टारिकाच्या इतिहासातील सुद्धा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या आधी कोस्टारिका मेक्सिकोकडून १९७५ साली ७ – ० अशा फरकाने पराभूत झाली होती. पण, तो सामना फूटबॉल विश्वचषकातील नव्हता. तर कोस्टारिकाला पराभूत करुन ग्रुप ई मध्ये स्पेनने जपानला मागे टाकत पहिले स्थान पटाकवले आहे.

स्पेनने असे डागले गोल

स्पेनसाठी पहिला गोल सामन्याच्या ११ मिनिटाला दानी आल्मो याने डागला. यानंतर मार्को असेंसियो याने २१ व्या मिनिटाला गोल केला. पुढे ३१ व्या मिनिटाला पेनल्टीवर फेरान टोरेस याने गोल डागला. पहिल्या हाफ पर्यंत स्पेनने कोस्टारिकावर ३ गोलची बढत नोंदवली होती. दुसऱ्या हाफ मध्ये स्पेनने आपले आक्रमण अधिक तीव्र केले. ५४ व्या मिनिटाला फेरान टोरेस याने आपला दुसरा आणि स्पेनसाठी ४ गोल डागला. यानंतर युवा खेळाडू गावी याने ७४ मिनिटाला पाचवा गोल नोंदविला. यानंतर ९० व्या मिनिटाला कार्लोस सोलर याने तर वाढवून मिळालेल्या इंज्युरी टाईममध्ये (९० + २ वें मिनिट) अल्वारो मोराट याने सातवा आणि अंतिम गोल डागला. (FIFA WC Spain vs Costa Rica)

कोस्टारिकाची हतबलता

संपूर्ण खेळात कोस्टारिका अत्यंत हतबल असल्याचे दिसत होते. त्यांच्या कोणत्याही खेळाडूकडे आक्रमकता आणि जिंकण्याची उमेद दिसली नाही. सगळ्या आघाड्यांवर कोस्टारिका पिछाडीवर होती. अगदी त्यांना एकही गोल डागता आला नाही यातच सर्व आले. पण, स्पेनने तब्बल १७ शॉटस् मारले त्यातील ८ शॉटस् हे ऑन टार्गेट होते त्यातील ७ गोल नोंदले गेले. स्पेनने तब्बल १०४३ पासेस दिले. स्पेनच्या या खेळापुढे कोस्टारिका कोठेच नव्हती कारण कोस्टारिकाला एक देखील शॉटस् खेळता आला नाही. तर एक सुद्धा शॉट त्यांचा ऑन टार्गेट नव्हता म्हणजे पूर्ण खेळात कोस्टारिकाला एकदा सुद्धा गोल करण्याची संधी मिळाली नाही. तर कोस्टारिकाने स्पेनच्या तुलनेत फक्त २३१ पासेस दिले. म्हणजे पूर्ण सामना केवळ स्पेनच खेळत होता. अत्यंत निर्दयीपणे स्पेनने आजच्या सामन्यात कोस्टारिकाला चिरडले. कोस्टारिकासाठी सुद्धा हा अत्यंत लाजिरवाना पराभव होता.

अधिक वाचा :

Back to top button