FIFA WC Iran Vs England : हिजाब विरोधी आंदोलन वर्ल्डकपच्या मैदानात; इराणच्या खेळाडूंकडून सरकारचा निषेध | पुढारी

FIFA WC Iran Vs England : हिजाब विरोधी आंदोलन वर्ल्डकपच्या मैदानात; इराणच्या खेळाडूंकडून सरकारचा निषेध

दोहा; पुढारी ऑनलाईन : फिफा विश्वचषकात इंग्लंड आणि इराण (FIFA WC Iran Vs England) यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वीच मोठा गदारोळ पाहण्यास मिळाला. इराणमध्ये हिजाब विराधी आंदोलनाची लाट उसळली आहे. या आंदोलनामुळे इराण अभूतपुर्व अशी अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या आंदोलनाची झळ थेट फिफा विश्वचषकातसुद्धा पाहण्यास मिळाली. आजच्या इंग्लंड विरुद्ध इराण सामन्यात सामना सुरु होण्यापुर्वी इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीतच गाण्यास नकार दिला. या कृतीद्वारे देशातील सरकार विरोधात होत असेलेल्या निदर्शनांना इराणच्या खेळाडूंनी समर्थन देत इराणच्या खेळाडुंनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. इराणमध्ये महिलांसाठी लागू असेलेल्या कठोर ड्रेसकोड विरोधात आंदोलन सुरु आहे.

याबाबत इराणचा कर्णधार अलीरेझा जहाँबख्श यांने सांगितले की, इराणमधील सरकारविरोधी निदर्शकांच्या समर्थनार्थ राष्ट्रगीत गाण्यास नकार द्यायचा की नाही हे संघाने घेतलेला सामुहिक निर्णय आहे. या कृतीनंतर खेळाडूंच्या घटनेला इराणच्या सरकारी टीव्हीने सेन्सॉर केले. (FIFA WC Iran Vs England)

मैदानात प्रेक्षकांनी झळकावली पोस्टर्स (FIFA WC Iran Vs England)

इंग्लड विरुद्ध इराणच्या पहिल्या सामन्यात इराणच्या प्रेक्षकांनी देखील इराण सरकारचा निषेध नोंदवर पोस्टर्स झळकावत सरकार विरोधात निदर्शन केले. यावेळी इराणच्या एका जोडप्याने आपल्या हातात ‘वुमन लाईफ फ्रिडम’ असा संदेश देणारे पोस्टर्स हातात झळकावले. या जोडप्याने संपूर्ण खचाखच भरलेल्या मैदानात अत्ंयत शांत चित्ताने आपला विरोध दर्शवला. अगदी याचीच प्रचित इराणच्या खेळाडुंकडून राष्ट्रगायनाच्यावेळी पहायला मिळाली.

Image

असे भडकले इराणमधील आंदोलन

महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील निदर्शने उग्र बनली. महसा अमिनी ही वायव्य इराणमधील साकेज शहरातील कुर्दिश महिला होती. 16 सप्टेंबर रोजी तेहरानमधील रुग्णालयात तीन दिवस कोमात राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. ज्या वेळी इराण पोलिसांनी तिला अटक केली, त्यावेळी ती कुटुंबासह तेहरानला आली होती. अमिनीने ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याचा आणि हिजाब घातला नसल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. (FIFA WC Iran Vs England)

इराणमधील बातम्यांनुसार पोलिसांनी अमिनीच्या डोक्यावर लाठीमार केला आणि तिचे डोके त्यांच्या गाडीवर आदळले होते. महसा अमिनी यांना मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. पोलिसांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिनी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, तर अमिनीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती आरोग्य दृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी होती. साकेज येथे अमिनी यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा हजारो महिलांनी त्यांचे हिजाब फेकून सरकारविरोधी घोषणा दिल्या होत्या.

अधिक वाचा :

Back to top button