पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषकाच्या दुस-या दिवशी इंग्लडने इराणचा 6 विरुद्ध 2 गोल फरकाने पराभव करत दणदणीत विजयी सलामी दिली. खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ब गटातील या सामन्यात इंग्लिश संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. पहिल्या आणि दुस-या हाफमध्ये प्रत्येकी तीन-तीन गोल करून इराणचा अक्षरश: धुव्वा उडवला.
अर्ध्या तासाचा खेळ संपला तरी दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. इंग्लंडच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी इराणवर आक्रमण केले. ते गोलपोस्टच्या अगदी जवळ येत पोहचत होते, पण त्यांचे प्रयत्नांना यश आले नाही. दुसरीकडे इराणीयन खेळाडूंना फुटबॉलवर ताबा मिळवणे कठीण जात असल्याचे दिसले.
इंग्लंडचा युवा खेळाडू ज्युड बेलिंगहॅमने 35 व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल केला. ल्यूक शॉच्या पासवर त्याने हवेत उसळलेला चेंडू कौशल्यापूर्ण हेडरद्वारे गोलपोस्टमध्ये पाठवला. त्याच्या हेडरवरून आलेल्या या गोलमुळे इंग्लंडने सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली.
बुकायो साकाने इंग्लंडची आघाडी दुप्पट केली. त्याने 43व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल केला. हॅरी मॅग्वायरच्या पासवर साकाने डाव्या पायाने फटकावलेला चेंडू थेट गोलपोस्टमध्ये पाठवला.
इराणचा गोलरक्षक जखमी झाल्यानंतर 14 मिनिटांचा इंज्युरी टाईम देण्यात आला. त्यामुळे 45 मिनिटांचा पूर्वाध संपल्यानंतर दोन्ही संघांना 14 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळाला. या वेळेचा फायदा उठवत इंग्लंडच्या रहिम स्टर्लिंगने गोल जाळे भेदले. त्याने 45+1 मिनिटात इंग्लंडची आघाडी 3-0 ने वाढवली. कर्णधार हॅरी केनच्या पासवर स्टर्लिंगने अप्रतिम गोल केला. विश्वचषकातील त्याचा हा पहिलाच गोल ठरला.
इंग्लंडने 62 व्या मिनिटाला इराणविरुद्ध 4-0 अशी आघाडी घेतली. बुकायो साकाने संघासाठी चौथा आणि वैयक्तीक दुसरा गोल केला नोंदवला. रहिम स्टर्लिंगच्या पासवर त्याने गोलजाळे भेदले.
इराणसाठी मेहदी तारेमीने पहिला गोल केला. घोलिजादेहच्या पासवर त्याने उत्कृष्ट गोल केला. याचबरोबर इराणने इंग्लंडची आघाडी एका गोलने कमी करण्यात यश मिळवले.
इंग्लंडने 70 व्या मिनिटाला चार बदल केले. हॅरी मॅग्वायर दुखापतीमुळे बाहेर पडला. त्याच्या जागी एरिक डायरला मैदानात पाठवण्यात आले. डायरशिवाय मार्कस रॅशफोर्ड, जॅक ग्रीलिश आणि फिल फोडेन यांना मैदानात उतरवले होते. इंग्लंडने दोन गोल करणारा बुकायो साका, एक गोल करणारा रहीम स्टर्लिंग आणि मेसन माऊंट यांना बाहेर बोलावले.
70 व्या मिनिटाला मैदानात आलेल्या मार्कस रॅशफोर्डने 71व्या मिनिटाला कर्णधार हॅरी केनच्या पासवर शानदार गोल केला. केनला 75व्या मिनिटाला बाहेर बोलावून त्याच्या जागी कॅलम विल्सनला मैदानात उतरवण्यात आले.
मँचेस्टर सिटीकडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या जॅक ग्रीलिशने सामन्यात इंग्लंडचा सहावा गोल केला. त्याने 89 व्या मिनिटाला कॅलम विल्सनच्या पासवर गोल केला. इंग्लंडने विश्वचषकातील त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली आहे. 2018 च्या विश्वचषकात त्यांनी पनामाविरुद्ध 6-1 असा विजय मिळवला होता.
स्टेडियमबाहेर तिकिटांवरून गोंधळ
काही चाहते तिकिटावरून खलिफा स्टेडियमबाहेर गोंधळ घालत होत आहेत. चाहते स्टेडियमवर (England vs Iran) प्रवेश मिळवण्यासाठी FIFA अॅपवरून त्यांची तिकिटे दाखवताना त्यांना तांत्रिक अडचण येत होती. फिफाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात FIFA ने सांगितले की, "काही प्रेक्षकांना FIFA तिकीट अॅपद्वारे तिकिटे मिळवण्यात समस्या येत आहेत. आम्ही या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. दरम्यान, ज्या चाहत्यांना त्यांचे मोबाईल तिकीट अॅक्सेस करता येत नाही त्यांनी त्यांचा ईमेल तपासावा. समस्या नसल्यास तेथे देखील निराकरण केले, ते काउंटरवर मदत घेऊ शकतात.
सामन्यादरम्यान इराणच्या गोलरक्षकाला दुखापत झाली. त्यामुळे सामना बराच वेळ थांबला होता. गोलकीपरच्या चेहऱ्यातून रक्त येत होते. अलीरेझा बेरनवंदवर मैदानावरच उपचार करण्यात आले. त्यानंतर सामना सुरू झाला. त्याच्या जागी बॅकअप गोलकीपरला होसेनीला मैदानात उतरवण्यात आले. तो प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलकिपिंग करणार आहे.
इंग्लंड : जॉर्डन पिकफोर्ड (गोलकीपर), जॉन स्टोन्स, हॅरी मॅग्वायर, किरन ट्रिपियर, डेक्लन राइस, ज्यूड बेलिंगहॅम, मेसन माउंट, ल्यूक शॉ, बुकायो साका, हॅरी केन, रहीम स्टर्लिंग.
इराण : अलिरेझा बैर्नवंद (गोलकीपर), सादेग मोहररामी, एहसान हजसाफी, मिलाद मोहम्मदी, अलिरेझा जहाँबख्श, मुर्तझा पौरलीगंजी, मेहदी तारेमी, रुझबेह चेश्मी, अली करीमी, माजिद होसेनी, अहमद नूरल्लाही.