FIFA One Love Armband Controversy: समलैंगिकतेचे समर्थन इंग्लंडच्या कॅप्टनला भोवणार! फिफा घालणार बंदी? | पुढारी

FIFA One Love Armband Controversy: समलैंगिकतेचे समर्थन इंग्लंडच्या कॅप्टनला भोवणार! फिफा घालणार बंदी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA One Love Armband Controversy : कतारमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा (FIFA World Cup 2022) सतत वादांच्या भोवऱ्यात अडकत चालली आहे. प्रेक्षकांवर घालण्यात आलेल्या अनेक निर्बंधांनंतर आता LGBTW वाद सुरू झाला आहे. इंग्लंडसह 8 संघांच्या खेळाडूंनी विश्वचषकादरम्यानच्या सामन्यांमध्ये समलैंगिक संबंधांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश कर्णधार हॅरी केन (Harry Kane) यानेही यात पुढाकार घेतला आहे. सोमवारी इराणविरुद्धच्या सामन्यात तो वन लव्ह बँड परिधान करून मैदानात उतरणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. वन लव्ह बँड हे LGBTW समुदायाचे प्रतीक आहे. त्याचवेळी फिफाने आक्षेप घेत या प्रकरणी महत्त्वाची भूमिका घेणार असल्याचे म्हटले आहे. जर एखादा संघ किंवा कोणत्याही संघाचा खेळाडू रेनबो बँड हातावर बांधून मैदानात उतरला तर तो फिफाच्या नियमांचा भंग ठरेल आणि अशी कृती करणा-या खेळाडूंवर बंदी घालण्यात येईल असा इशारा फिफाने दिला आहे.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याच्यासह संपूर्ण इंग्लंडच्या संघातील खेळाडू सोमवारी होणाऱ्या सामन्यात LGBTW म्हणजेच समलैगिक संबंधांच्या समर्थनार्थ वन लव्ह बँड हातावर बांधणार असल्याचे समजते आहे. इंग्लंडचा सामना इराणविरुद्ध आहे. इराण हा एक इस्लामिक देश आहे आणि तिथे समलैगिक संबंधांवर बंदी आहे. तर फिफा (FIFA) विश्वचषक 2022 ही स्पर्धा ज्या कतारमध्ये होत आहे तिथे सुद्धा समलैगिक संबंधांवर बंदी आहे. त्यामुळे फिफा वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान नवा वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (FIFA One Love Armband Controversy)

हॅरी केन सोबत ‘हे’ खेळाडूही समर्थनार्थ आले पुढे…

इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केन याने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, संपूर्ण संघातील खेळाडूंसह स्टाफ आणि संघटना या नात्याने आम्हाला सामन्यात वन लव्ह बँड हातावर बांधायचा आहे. याबाबत फिफाशी चर्चा सुरू आहे. सामन्यापूर्वी फिफा आपला निर्णय सांगेल. आम्ही आमची इच्छा स्पष्ट केली आहे. इंग्लंडसोबतच ‘नेदरलँड’चा व्हर्जिल व्हॅन डायक, ‘वेल्स’चा गॅरेथ बेल आणि ‘जर्मनी’चा मॅन्युएल न्युअर यांनीही वन लव्ह बँड बांधूनच मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. असे एकूण 8 संघ आहेत, जे समलैगिक संबंधांच्या समर्थनार्थ आहेत. मात्र, आतापर्यंत या संघांची आणि खेळाडूंची नावे समोर आली आहेत. (FIFA One Love Armband Controversy)

फिफा ‘ही’ कारवाई करू शकते….

हॅरी केन आजच्या इराणविरुद्धच्या सामन्यात रेनबो बँड हातावर बांधून मैदानात उतरला तर त्याला फिफाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. तो मैदानात उतरताच रेफरी त्याला पिवळे कार्ड दाखवू शकतात. दुसरीकडे, जर हॅरी केनने दुसऱ्या सामन्यातही बँड घातला, तर त्याला पुन्हा पिवळे कार्ड दाखवले जाऊ शकते आणि तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. तर दुसरीकडे असेही सांगितले जात आहे की सामन्यापूर्वी फिफा अधिकाऱ्यांना संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पाठवून खेळाडूंना बँड न बांधण्याबाबत सूचना केली जाऊ शकते. याशिवाय दंड किंवा बंदीही घातली जाण्याची दाट शक्यता आहे.

Back to top button