FIFA WC Match FIXING : फिफा वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग! कतारकडून इक्वाडोरला सामना गमवायला 60 कोटींची लाच | पुढारी

FIFA WC Match FIXING : फिफा वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग! कतारकडून इक्वाडोरला सामना गमवायला 60 कोटींची लाच

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होत आहे. यजमान कतारचा सलामीचा सामना इक्वेडोरशी होणार आहे. हा सामना अल खोर येथील अल बायत स्टेडियमवर होणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्याआधीच या सामन्यावरून वाद निर्माण झाला आहे. फिफा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच यजमान कतारवर गंभीर आरोप झाले आहेत. सौदी अरेबियातील ब्रिटीश सेंटरचे स्ट्रॅटेजिक पॉलिटिकल अफेअर्सचे तज्ज्ञ आणि प्रादेशिक संचालक अमजद ताहा यांनी ट्विट करून कतारवर मोठे आरोप केले आहेत. कतारने इक्वेडोर संघाला सलामीचा सामना गमावण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. कतार आणि इक्वाडोरच्या फुटबॉल शिबिरांमध्ये उपस्थित असलेल्या सूत्रांनी याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अमजद यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, एक्सक्लुझिव्ह. कतारने इक्वेडोरच्या आठ खेळाडूंना 60 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सेकंड हाफमध्ये सामना 1-0 ने गमावण्यास सांगितले आहे. दोन्ही संघांच्या कॅम्पमधील पाच जणांनी याला दुजोरा दिला आहे. तसे होणार नाही अशी आशा करूया. मला वाटते की हे शेअर केल्याने या मॅच फिक्सिंगच्या प्रकाराला आळा बसेल. जगाने फिफाला भ्रष्टाचार करण्यापासून रोखले पाहिजे,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मात्र, या आरोपांवर कतार किंवा इक्वाडोरने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कतार आधीच अनेक संकटांनी घेरला आहे. स्टेडियममध्ये बिअरवर बंदी घातल्याने यजमान देशाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीही या देशावर अनेक आरोप झाले आहेत. कतारवर फिफा विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी लाच दिल्याचा आणि स्थलांतरित कामगारांसाठी मानवी हक्कांचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला होता. अशा सर्व वादांच्या भोव-यात सापडूनही कतारमध्ये आजपासून फिफा विश्वचषक स्पर्धेला दिमाखात प्रारंभ होत आहे. मात्र, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नवा वाद उफाळला आहे. यावेळी कतारवर स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी एक्वाडोर संघातील खेळाडूंना सामना गमावण्यासाठी लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कतार आणि इक्वाडोर हे दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला. ऑक्टोबर 2018 मध्ये कतार आणि इक्वेडोर संघांची शेवटची टक्कर झाली होती. तो सामना कतारने 4-3 अशा गोल फरकाने जिंकला होता. कतारचा हा पदार्पण विश्वचषक आहे आणि संघ घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. वर्ल्ड कप स्पर्धेत यापूर्वी डेब्यू करणाऱ्या संघाने 2002 मध्ये पहिल्याच सामन्यात विजय मिळवला होता. त्यावेळी सेनेगलने 1998 च्या विश्वविजेत्या फ्रान्सचा पराभव करून सर्वात मोठा उलटफेर केला होता. सेनेगलच्या लक्षवेधी कामगिरीने त्यावेळी सर्व फुटबॉल जगत आश्चर्यचकीत झाले होते.

Back to top button