Lionel Messi injury : मेस्सीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! फुटबॉल जगतात खळबळ | पुढारी

Lionel Messi injury : मेस्सीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! फुटबॉल जगतात खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lionel Messi Injury Fifa World Cup 2022 : कतारमध्ये आजपासून (20 नोव्हेंबर) सुरू होत असलेल्या FIFA विश्वचषक स्पर्धेमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अर्जेंटिना आणि मेस्सीच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी असल्याची चर्चा आहे. फिफा वर्ल्ड कप जिंकण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या अर्जेंटिना संघाचा कर्णधार स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) संघाच्या पहिल्या सामन्यापूर्वी प्रशिक्षणात संघापासून अंतर ठेवल्याचे समजते आहे. दुखापतीमुळे तो बाहेर बसण्याची शक्यता अनेक दिग्गज विश्लेषकांनी वर्तवली आहे. अर्जेंटिनाचा पहिला सामना 22 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाविरुद्ध आहे. अशातच स्पर्धेतील पहिल्या सामन्याला दोन दिवस शिल्लक राहिले असताना मेस्सी दुखापतग्रस्त असल्याचे वृत्त समोर आल्याने फुटबॉल जगतात खळबळ माजली आहे. दरम्यान, मेस्सी खेळणार की नाही हे अद्याप संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलेले नाही.

सराव सत्रादरम्यान मेस्सीने संघापासून स्वतःला ठेवले दूर

सराव सत्रादरम्यान मेस्सीने आपल्या सहकारी खेळाडूंपासून स्वत:ला दूर ठेवले आणि अतिशय थोडाच वेळ ट्रेनिंग सेशनमध्ये भाग घेतला. त्यामुळे तो दुखापतरस्त असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मेस्सी (Lionel Messi) दुखापतग्रस्त नसून केवळ खबरदारी म्हणून त्याला संघापासून दूर ठेवण्यात आल्याचे अर्जेंटिनाच्या माध्यमांनी आपल्या वृत्तांमध्ये म्हटले आहे. मेस्सीने 19 नोव्हेंबर रोजी स्वतःला प्रशिक्षण मैदानापासून दूर ठेवले आणि तो फक्त जिममध्येच वर्कआउट करताना दिसला. विश्वचषकासाठी येण्यापूर्वी मेस्सी त्याचा क्लब पॅरिस सेंट जर्मेन कडून सामना खेळला नव्हता. (Lionel Messi Injury Fifa World Cup 2022)

जखमी खेळाडूंची यादीत भर

विश्वचषक सुरू होण्यापूर्वी जखमी झालेल्या खेळाडूंची यादी लांबत चालली आहे. गतविजेत्या फ्रान्सला सर्वाधिक फटका बसला असून आतापर्यंत सहा खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. स्टार स्ट्रायकर करीम बेन्झेमा हे जखमी खेळाडूंच्या यादीत सामील होणारे नवीन नाव ठरले आहे. अर्जेंटिनाचे दोन खेळाडूही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. संघाचे दोन स्टार खेळाडू निकोलस गोन्झालेझ आणि जोक्विन कोरिया हे दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने (एएफए) याबाबत माहिती दिली होती. अर्जेंटिनाचा संघ विश्वचषक जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार मानला जात असताना संघाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर जखमी असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. (Lionel Messi Injury Fifa World Cup 2022)

सेनेगलचा सादिओ माने सुद्धा वर्ल्ड कपमधून बाहेर

कतारमधील फुटबॉल महाकुंभापूर्वीच सेनेगल संघाला मोठा धक्का बसला. संघाचा कर्णधार आणि स्टार फॉरवर्ड सादिओ माने (Sadio Mane) दुखापतीमुळे या जागतिक स्पर्धेतून बाहेर पडला. सेनेगल संघाने याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत सादिओला फिफा विश्वचषक स्पर्धेतून वगळण्याची घोषणा केली. यजमान कतार, नेदरलँड्स आणि इक्वेडोर, सेनेगल हे संघ अ गटात आहेत. सेनेगलचा पहिला सामना 21 नोव्हेंबरला नेदरलँडशी होणार आहे.

Back to top button