Sunil Gavaskar : गावस्करांची भविष्यवाणी, हार्दिक होईल कर्णधार आणि ‘हे’ खेळाडू घेतील निवृत्ती | पुढारी

Sunil Gavaskar : गावस्करांची भविष्यवाणी, हार्दिक होईल कर्णधार आणि ‘हे’ खेळाडू घेतील निवृत्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sunil Gavaskar : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लडने टीम इंडियाचा (Team India) दारुण पराभव केला. टीम इंडियाचा उपांत्य फेरीत पराभव होईल, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. भारत हा विश्वचषक जिंकण्यासाठी फेव्हरिट मानला जात होता. अशा स्थितीत उपांत्य फेरीतून बाहेर पडल्याने आयसीसी ट्रॉफी (icc trophy) जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिले. टीम इंडियाला 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

दरम्यान, टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी संघावर जोरदार टीका केली आहे. या विश्वचषकानंतर भारताच्या टी 20 सेटअपमध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील, असे गावस्कर यांना वाटते. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसारखे (Virat Kohli)खेळाडू क्रिकेटचा हा फॉरमॅट सोडू शकतात आणि हार्दिक पंड्या (hardik pandya) संघाचे नेतृत्व करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

भारत-इंग्लंड (IND vs ENG) सामन्यानंतर गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले की, ‘टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौ-याला 18 नोव्हेंबर रोजी सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी वेगळा संघ निवडण्यात आला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम तिथे जात आहे. निवड समितीने स्पष्ट संकेत दिल्याने तो संघावर आपली छाप पाडण्यास सुरुवात करेल. हार्दिकने (hardik pandya) आयपीएलमध्ये (IPL) गुजरात संघाचा कर्णधार म्हणून त्या संघाला पहिल्याच प्रयत्नात आयपीएल जिंकून दिले. बीसीसीआयने (BCCI) हार्दिकला टी-20 संघाचा कर्णधार म्हणून हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली ही टीम वेगळी असेल असे मला वाटते.’

येणा-या काळात काही खेळाडू निवृत्तीही घेतील. यावर सध्या नेमके भाष्य करता येणार नाही. विचार करण्याची ही वेळ नाही. भारताकडे 30 किंवा या वयाच्या आसपास असे बरेच खेळाडू आहेत जे टी 20 साठी आपला दावा करत आहेत. हार्दिक पंड्याने यापूर्वी तीन सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्ध दोन सामने जिंकले. याशिवाय आशिया कपमध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला होता. आता तो 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. दिनेश कार्तिक आणि रविचंद्रन अश्विन यांना यापुढे टी-20 फॉरमॅटमध्ये संघात स्थान दिले जाणार नाही, असेही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे.

इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. त्यांनी 169 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या. हार्दिकने 33 चेंडूत 63 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी विराट कोहलीने 50 धावा केल्या. प्रत्युत्तरार इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता 170 धावा केल्या. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 आणि कर्णधार जोस बटलरने 49 चेंडूत 80 धावा फटकावल्या.

Back to top button