

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवामुळे भारताचे फायनल खेळण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. टीम इंडिया 2014 मध्ये टी-20 वर्ल्ड कपची शेवटची फायनल खेळली होती, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. आता 13 नोव्हेंबरला अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
इंग्लंडविरुद्ध भारतीय ओपनर जोडीने पुन्हा एकदा निराशा केली. केएल राहुल 5 चेंडूत 5 धावा करून बाद झाला, तर रोहित शर्माने 28 चेंडूत 27 धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांचा स्ट्राईक रेट 100 किंवा त्याहून कमी होता. टी-20 क्रिकेटमध्ये जर एखाद्या संघाला मोठ्या लक्ष्याचा पाया घालायचा असेल, तर सलामीवीरांना पहिल्या 6 षटकांचा फायदा घ्यावा लागतो. पॉवर प्ले दरम्यान 30 यार्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात, पण भारताला त्याचा फायदा घेता आला नाही. उपांत्य फेरीत भारताने पहिल्या 6 षटकात केवळ 38 धावा केल्या होत्या, तर दुसरीकडे इंग्लंडबद्दल बोलायचे तर त्यांनी पॉवरप्लेचा फायदा घेत 63 धावा वसूल केल्या होत्या.
या विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतासाठी एक्स फॅक्टर ठरला. मात्र या खेळाडूला उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्याचे दडपण सहन करता आले नाही. सूर्या अवघ्या 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडनेही या खेळाडूसाठी खास योजना आखली होती. इंग्लिश गोलंदाजांनी पेस ऐवजी धिम्या गतीने मारा करून सूर्याला चक्रव्ह्यू मध्ये अडकवले. त्यामुळे 360 मध्ये फटकेबाजी करणारा सूर्या क्षणार्धात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. आदिल रशीद त्याला माघारी पाठवण्यात महत्त्वाची भूमिका वठवली.
हार्दिक पंड्याच्या 63 आणि विराट कोहलीच्या 50 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 168 धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पॉवरप्लेमध्ये भुवनेश्वर कुमार आणि इतर गोलंदाज विकेट घेऊ शकले नाहीत. अक्षर पटेल आणि आर अश्विन या दोघांनाही भारताला यश मिळवून देता आले नाही. इंग्लिश सलामीवीरांनी अक्षरश: भारतीय गोलंदाजांची पिसे काढत येथेच्छ धुलाई केली. गोलंदाजांनी पूर्णपणे निराश केली. सामन्यादरम्यान एकदाही भारतीय गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न करताना दिसले नाहीत. सहा पैकी चार गोलंदाजांनी 10 हून अधिक इकॉनॉमी रेटने धावा वाटल्या.
169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर (80) आणि अॅलेक्स हेल्स (86) यांनी दमदार खेळी केली. या दोघांनी एकही विकेट न गमावता इंग्लंडला सहज विजय मिळवून दिला. बटलर आणि हेल्स यांनी सुरुवातीपासूनच तुफानी फलंदाजी केली. मैदानात खेळताना या दोन्ही फलंदाजांनी भारतीय क्षेत्ररक्षकांना सळो की पळो करून सोडले.