R Ashwin : वास घेऊन अश्विनने घेतला ‘जॅकेट’चा शोध! (Video Viral) | पुढारी

R Ashwin : वास घेऊन अश्विनने घेतला ‘जॅकेट’चा शोध! (Video Viral)

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा फिरकीपटू आर अश्विनचा (R Ashwin) एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 6 नोव्हेंबरच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा ब्रॉडकास्टर टीव्हीला प्लेइंग इलेव्हन बाबत माहिती देत होता. त्याचवेळी अश्विन रोहितच्या मागे एक विचित्र कृती करताना पकडला गेला. अश्विनच्या दोन्ही हातांमध्ये टीम इंडियाचे जॅकेट आहेत. तो या दोन्ही जॅकेट्सचा आळीपाळीने वास घेतो. यानंतर, तो एक जाकीट खाली ठेवून निघून जातो. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेगवेगळे कॅप्शन लिहून लोक अश्विनची खिल्ली उडवत आहेत. या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव केला.

चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असतात. काहीवेळा चाहत्यांनी शेअर केलेले व्हिडिओ मीम्स बनवणाऱ्यांसाठी मसाला बनतात. आर अश्विनचा (R Ashwin) असाच एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 सामन्याचा आहे.

हा व्हिडिओ क्रिकेटर अभिनव मुकुंदने शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात नाणेफेक करताना बोलताना दिसत आहे. दरम्यान, टीम इंडियाचा अनुभवी ऑफस्पिनर अश्विन भारतीय क्रिकेट संघाचे दोन जॅकेट तपासताना दिसला. व्हिडिओमध्ये अश्विन (R Ashwin) जॅकेटचा वास घेताना दिसत आहे, तो आपले कोणते जॅकेट आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो एक जॅकेट घेऊन निघून जातो. अभिनव मुकुंदने अश्विनला योग्य जॅकेट शोधण्याबाबत विचारले आहे.

अश्विनचा रिप्लाय…. (R Ashwin)

अश्विनने अभिनव मुकुंदच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, ‘जॅकेटचा वास घेऊन मी माझ्या जॅकेटवर मारलेले परफ्यूम तपासले. त्यामुळे कोणते जॅकेट माझे आहे हे मला समजले.’

भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंगनेही या घटनेवर प्रतिक्रिया देत अश्विनच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. ऐश, तू कशाचा वास घेत आहेस? अशी विचारपूस करत त्याने हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे.

अश्विनची जगभरातील हुशार खेळाडूंमध्ये गणना होते. तो वेळोवेळी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला मात देत आला आहे. टी 20 विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्ध भारताच्या पहिल्या गट साखळी सामन्यात त्याने आपल्या उपस्थितीने सर्वांना प्रभावित केले. भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती. अश्विन स्ट्राईकवर होता. मोहम्मद नवाज गोलंदाजी करत होता. नवाजने शेवटचा चेंडू लेगसाईडला टाकला आणि अश्विनने प्रसंगावधान दाखवत तो सोडून दिला. अंपायरने तो चेंडू वाईड ठरवला. अश्विनच्या या क्रिकेट कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले. यानंतर त्याने शेवटचा चेंडू मिड ऑफला फटकावून एकेरी धाव घेतली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

अश्विनने अश्विनने टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीतील पाच सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 7.52 आहे. त्याने झिम्बाब्बे विरुद्ध 22 धावांत 3 बळी घेतले.

Back to top button