Suryakumar Yadav : अबब! सूर्या 400 च्या स्ट्राईक रेटने वसूल करतो धावा, फक्त एकदाच झालाय आऊट | पुढारी

Suryakumar Yadav : अबब! सूर्या 400 च्या स्ट्राईक रेटने वसूल करतो धावा, फक्त एकदाच झालाय आऊट

पुढारी ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीम इंडियासाठी नवीन आशा म्हणून उदयास आला आहे, जो भारतासाठी कठीण परिस्थितीत संकटमोचक ठरत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने अत्यंत बिकट परिस्थितीत धावा कशा वसूल करायच्या आणि संघासाठी विजयाचा आधार कसा निर्माण करायचा हे दाखवून दिले. भारतीय संघाच्या मधल्या फळीतील क्रमांक 4 साठी अनेक प्रयोग केले गेले. यात किती खेळाडूंना आजमावले गेले, याची गणतीच नाही. पण आता चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज सापडला आहे. तो म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्यानेही या क्रमांकावर आपणच कसे जगात भारी आहोत हे सिद्ध कसून दाखवले आहे.

सूर्यकुमारने 2022 मध्ये 550 चेंडूत 1026 धावा चोपल्या…. (Suryakumar Yadav)

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने भारतासाठी कठीण परिस्थितीतही धावा केल्या. तुल्यबळ मानल्या जाणा-या झिम्बाब्वे संघाविरुद्ध भारतीय संघाने 101 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. अशात 14 वे षटक चालू असताना सूर्यकुमार नावाचे वादळ मैदानात घोंगावू लागले आणि या वादळाच्या तडाख्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडाला. सूर्यकुमारने तडाखेबाज अर्धशतक झळकावून टीम इंडियाला सुरक्षित धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला. या खेळीनंतर, सूर्यकुमार यादव एका कॅलेंडर वर्षात जागतिक क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा फलंदाज बनला. भारतासाठी तर तो अशा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने यावर्षी 550 चेंडूत 1026 धावा केल्या आहेत.

टी 20 मध्ये 20 व्या षटकात 400 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो आणि त्याचा सर्वाधिक प्रयत्न संघासाठी शेवटपर्यंत खेळून जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. टी-20 फॉरमॅटमध्ये असे अनेक प्रसंग आले आहेत की तो शेवटच्या सामन्यात नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा परिस्थितीत जर आपण टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 व्या षटकात धावा काढण्याबद्दल चर्चा करायची झाल्यास यात सूर्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये 20 व्या षटकात एकूण 18 चेंडूंचा सामना केला आहे आणि 400 च्या स्ट्राइक रेटने एकूण 72 धावा वसूल केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 18 चेंडूत एक चौकार आणि 10 षटकार ठोकले आहेत, तर 2 डॉट घालवले आहेत. यादरम्यान तो फक्त एकदाच आऊट झाला आहे.

सूर्यकुमार यादव टी-20 मश्ये 20 व्या षटकातील खेळी (Suryakumar Yadav)

धाव – 72
चेंडू – 18
स्ट्राइक रेट – 400
षटकार – 10
चौकार – 1
डॉट बॉल – 2
आऊट – 1

Back to top button