Khel Ratna Award : ‘खेलरत्न’साठी अचंता शरथ कमलची शिफारस; एकाही क्रिकेटपटूचा नाही समावेश | पुढारी

Khel Ratna Award : ‘खेलरत्न’साठी अचंता शरथ कमलची शिफारस; एकाही क्रिकेटपटूचा नाही समावेश

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताचा स्टार टेबलटेनिसपटू अचंता शरथ कमलची यंदाच्या ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ (Khel Ratna Award) पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याचबरोबर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि कुस्तीपटू अंशू मलिकची ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 40 वर्षांच्या शरथ कमलने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्याने तीन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकले होते.

यंदा खेलरत्नसाठी (Khel Ratna Award) फक्त शरथ कमल या एकट्याच खेळाडूची शिफारस करण्यात आली आहे. शरथ कमलने आशियाई गेम्समध्ये देखील दोनवेळा पदक जिंकून दिले आहे. मनिका बात्रानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारा शरथ हा दुसरा टेबलटेनिस खेळाडू ठरेल.

यंदा एकूण 25 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यात युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, बॉक्सर निखत झरीन आणि बुद्धिबळपट्टू प्रज्ञानंदा, कुस्तीपटू अंशू मलिक यांचादेखील समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा अर्जुन पुरस्कारासाठी एकाही क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस करण्यात आलेली नाही.

लक्ष्य सेनने पुरुष बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. याचबरोबर तो ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेता ठरला होता. तो थॉमस कपमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय बॅडमिंटन संघातही होता. याचबरोबर त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरीत सुवर्ण तर मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले आहे.

बॉक्सर निखत झरीनने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतदेखील सुवर्ण कमाई केली होती.

हेही वाचा…

Back to top button