

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup स्पर्धेत आज मोठा उलटफेर झाला. आयर्लंडने इंग्लंडला पाच धावांनी पराभूत केले. १४ षटकांनंतर झालेल्या पावसामुळे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल आर्यलंडच्या बाजूने देत त्यांना विजयी संघ म्हणून घोषित केले. १४ षटकांपर्यंतच्या खेळात इंग्लंड पाच धावांनी मागे राहिल्यामुळे आयर्लंडला विजयी घोषित करण्यात आले.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयर्लंडने 19.2 षटकात 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाच्या संघाची खराब सुरुवात झाली आणि लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजांची दमछाक झाली. इंग्लंडने 14.3 षटकांत 5 बाद 105 धावा केल्या. तेव्हा त्यांना विजयासाठी 33 चेंडूत 53 धावांची गरज होती. मात्र, त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. काही वेळाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आयर्लंडला अवघ्या 5 धावांनी विजयी घोषित केली.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी निराशा केली. कर्णधार जोस बटलर (0) आणि अॅलेक्स हेल्स (7) स्वस्तात बाद झाले. जोशुआ लिटलने दोघांनाही माघारी धाडले. फिओन हँडने बेन स्टोक्स (06)ला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर 21 चेंडूत 18 धावा करून हॅरी ब्रूक जॉर्ज डॉकरेलचा बळी ठरला. डेव्हिड मलान 37 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. मॅकार्थीच्या चेंडूवर फिओन हँडने त्याचा झेल घेतला.
आयर्लंडच्या संघाने एकदा 12 षटकांत 2 बाद 103 धावा केल्या होत्या. यानंतर संघाचे उर्वरित आठ फलंदाज 55 धावा जोडून पॅव्हेलियनमध्ये परतले. आयर्लंडकडून कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने सर्वाधिक 62 धावा केल्या. फिरकीपटू लियाम लिव्हिंगस्टोन आणि वेगवान गोलंदाज मार्क वुड यांनी इंग्लंडसाठी चांगली गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
पॉल स्टर्लिंगच्या रूपाने आयर्लंडला पहिला धक्का बसला. त्याला मार्क वुडने सॅम कुरनच्या हाती झेलबाद केले. स्टर्लिंगने आठ चेंडूंत 14 धावा केल्या. त्याच्यानंतर लॉर्कन टकर पॅव्हेलियनमध्ये परतला. 27 चेंडूत 34 धावा करून टकर धावबाद झाला. त्याने बलबर्नीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. 103 धावसंख्या असताना तो बाद झाला. याच धावसंख्येवर हॅरी टॅक्टर बाद झाला. दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला जोस बटलरने मार्क वुडकरवी झेलबाद केले.
कर्णधार अँड्र्यू बालबर्नी 47 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. बालबर्नीला लियाम लिव्हिंगस्टोनने अॅलेक्स हेल्सच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर लिव्हिंगस्टोनने जॉर्ज डॉकरेलला (0) क्लीन बोल्ड केले. कर्टिस कॅम्पर 11 चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. मार्क वुडने त्याला जोस बटलरकरवी झेलबाद केले.