Ind Vs Pak : रन मशिनच्या खेळीनं भारत झाला ठप्प, UPI सह दिवाळीची ऑनलाईन खरेदी थांबली | पुढारी

Ind Vs Pak : रन मशिनच्या खेळीनं भारत झाला ठप्प, UPI सह दिवाळीची ऑनलाईन खरेदी थांबली

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीयांसाठी पाकिस्तानवरील (Ind Vs PaK) विजय विश्वचषक जिंकण्यापेक्षाही मोठा आहे. त्यामुळे भारतीयांची खरी दिवाळी रविवारी साजरी झाली. विराट कोहलीला ‘किंग कोहली’ का म्हणतात ते त्याने रविवारी मेलबर्नला दाखवून दिले. भारतीयांनीही दिवाळीच्या खरेदीकडे पाठ करत हा सामना पाहिला. सामन्यादरम्यान ऑनलाइन खरेदी थांबल्यामुळे रविवारी UPI व्यवहारांमध्येही घट झाल्याचे दिसून आले.

भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) हा हाय व्होल्टेज सामना ‘न भूतो न भविष्य’ असाच पहायला मिळाला. भारताच्या विजयाची शक्यता प्रत्येक षटकामागून धूसर होत असताना विराटने शेवटच्या तीन षटकांत सामन्याचा नूरच पालटला. त्याने हरलेला सामना भारताला जिंकून दिला. हा विजय म्हणजे भारतीयांना आपल्या संघाने दिलेली सर्वोत्तम दिवाळी भेट आहे. ९० हजारांहून अधिक प्रेक्षकांसमोर कोहलीने या उच्च-दबाव सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. डिस्ने हॉटस्टारवर १.८ कोटींहून अधिक लोकांनी हा सामना पाहिला. या सामन्यामुळे लोक सर्व कामे सोडून मोबाईल व टीव्हीसोर चिकटून राहिले होते.

दिवाळीमुळे रविवारी सकाळी ९ ते दुपारी १:30 वाजेपर्यंत भारतपे अॅपवरील व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली होती. पण सामना सुरू होताच, दुपारी १.३० नंतर व्यवहार हळूहळू कमी होऊ लागले. यावरून लोकांनी दिवाळीच्या खरेदीपेक्षाही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याला पसंती दिली असल्याचे स्पष्ट होते. मॅक्स लाइफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मिहिर व्होरा यांनी ट्विटमध्ये सांगितले की, रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत UPI व्यवहारात घट झाली. जसजसा सामना मनोरंजक बनला तशी ऑनलाइन खरेदी थांबली आणि सामन्यानंतर त्यात वाढ झाली.

अभिनेता आयुष्मान खुराना यानेही ट्विटमध्ये क्रिकेटच्या चाहत्यांमधील उत्साहाबद्दल सांगितले आहे. “ही कथा माझ्या भावी पिढ्यांसाठी आहे. मी मुंबई-चंदीगड फ्लाइटमधील शेवटची दोन षटके टेक ऑफ करण्यापूर्वी प्रवाशांसोबत पाहिली. मला खात्री आहे की, क्रिकेट चाहत्या पायलटने मुद्दाम ५ मिनिटे उशीर केला आणि कोणीही तक्रार देखील केली नाही”, असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button