

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने आपला प्रवास सुरु केला आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील हाऊसफुल्ल स्टेडियमवर रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर पोहोचले. पाकिस्तानच्या पाठोपाठ भारताचे राष्ट्रगीत वाजले. राष्ट्रगीत संपताच रोहित शर्मा भावूक झाला. कर्णधार म्हणून रोहित शर्माची आयसीसीची ही पहिलीच स्पर्धा आहे. रोहित शर्मा गेल्या वर्षी टी 20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचा कर्णधार झाला आहे. या सामन्यात भारताने ऋषभ पंतपेक्षा दिनेश कार्तिकला प्राधान्य दिले आहे. तर गोलंदाजीत मोहम्मद शमी आणि आर. अश्विनला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाने मागच्या वर्षीची विश्वचषक स्पर्धा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळली होती. यंदा रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरली आहे. दरम्यान, आज स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला. आपले अश्रू दिसू नयेत म्हणून त्याने डोळे घट्ट मिटले. पण त्याचे पाणावले डोळे क्लोज अप कॅमे-याच्या माध्यमातून अवघ्या जगला दिसले. राष्ट्रगीत गायनानंतरची रोहितची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याचे फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही आणि कर्णधार बाबर आझम गोल्डन डकवर बाद झाला. बाबर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्यानंतर अर्शदीप सिंगने भारतीय संघाला दुसरे यश मिळवून दिले. डावाच्या चौथ्या षटकाच्याशेवटच्या चेंडूवर त्याने पाकिस्तानचा भरवश्याचा फलंदाज रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रिझवाने 12 चेंडूत 4 धावा केल्या.