पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना २३ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. अशातच भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने (Dhanashree Verma) टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी इस्टाग्रामवर वर्ल्ड कपचे एक गाणं शेअर केलं आहे. धनश्रीच्या आधी तिचा पती यजुवेंद्र चहलने या गाण्याचा व्हिडिओ बनवून शेअर केला होता. तो व्हिडिओ लोकांना खूप आवडला होता.
युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर वर्ल्ड कपचे गाणे शेअर केले आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चहल आगामी वर्ल्ड कपसाठी तयारी करताना दिसत आहे. तो जोरदार सराव करताना दिसत आहे. यानंतर तो मैदानात त्याच्या इतर सहकाऱ्यांना भेटताना दिसत आहे. युजुवेंद्र चहलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने शेअर केलेला व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 'बल्ला चला, छक्का लगा… ये कप हमारा है घर लेकर आ…' या गाण्यावर खुप चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते देखील कमेंटच्या माध्यमातून युझीला विश्वचषकासाठी शुभेच्छा देत आहेत.
चहलची पत्नी धनश्रीनेही हेच गाणं तिच्या इन्स्टाग्राम अकांउटवरून शेअर केले आहे. मात्र या व्हिडिओमध्ये तिने बदल केला आहे. या व्हिडीओत धनश्री (Dhanashree Verma) स्वत: डान्स करताना दिसत आहे. डान्स करताना चहलच्या पत्नीने भारतीय संघाची जर्सी परिधान केली आहे.
या स्पर्धेतील अद्याप पात्रता फेरीतले सामने खेळवले जात आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना दिवाळीच्या एक दिवस अगोदर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला सुपर-१२ च्या गट-ब मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात टीम इंडियाशिवाय पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका देखील आहेत.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू – श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई.