Mitchell Starc Video : भारतीय क्रिकेटर ‘दीप्ती’चे नाव घेऊन मिचेल स्टार्कची बटलरला धमकी! | पुढारी

Mitchell Starc Video : भारतीय क्रिकेटर ‘दीप्ती’चे नाव घेऊन मिचेल स्टार्कची बटलरला धमकी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mitchell Starc video : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी 20 (England vs Australia, 3rd T20I) सामना पावसामुळे रद्द करावा लागला. जरी हा सामना पूर्ण होऊ शकला नसला तरी, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क चर्चेत आला आहे. वास्तविक, पावसामुळे सामना 12 षटकांचा करण्यात आला होता, परंतु केवळ इंग्लंड संघ 12 षटकांचा खेळ करू शकला. दुसरीकडे पावसामुळे ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करू शकला नाही. पण इंग्लंडच्या डावादरम्यान ऑस्ट्रेलियन गोलंदाज स्टार्कने असे काही केले की, ज्यामुळे बरीच चर्चा होत आहे. झाले असे की, इंग्लंडच्या डावाच्या पाचव्या षटकात स्टार्क डेव्हिड मलानविरुद्ध गोलंदाजी करत होता, तर जोस बटलर नॉन स्ट्राइकवर उभा होता.

अशा स्थितीत त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर मालनने चेंडूचा बचाव केला. त्याचवेळी जेव्हा स्टार्कने चेंडू पकडला आणि धावपट्टीकडे परतायला सुरुवात केली, तेव्हा त्याने नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या जोस बटलरकडे पाहिले आणि म्हणाला, ‘मी दीप्ती नाही, म्हणूनच मी हे करणार नाही. पण याचा अर्थ तू क्रीजमधून लवकर बाहेर पडू शकतोस.’ हे ऐकल्यानंतर बटलरने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला, ‘मला वाटत नाही की मी हे केले आहे.’ यानंतर दोघेही पुन्हा एकमेकांकडे पाहून हसताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वास्तविक, नॉन स्ट्राईकवर उभा असलेला बटलर गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच त्याच्या क्रीजमधून बाहेर पडत होता. अशा परिस्थितीत स्टार्कने इशारा देताना भारतीय महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्माच्या नावाचा उल्लेख करत बटलरला उद्देशून टीप्पणी केली.

नुकतेच इंग्लंड आणि भारतीय महिला संघादरम्यान झालेल्या एका सामन्यादरम्यान भारताच्या दीप्ती शर्माने (Deepti Sharma) एका महत्त्वाच्या प्रसंगी इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला नॉन-स्ट्रायकर एंडवर धावबाद केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. क्रिकेटच्या नियमांवरूनही बराच गदारोळ झाला होता. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी तर दीप्तीवर निशाणा साधला आणि तिने ज्या मंकडींग पद्धतीने धावबाद केले ते क्रिकेट स्पिरिटच्या विरुद्ध असल्याची टीका केली होती.

 

Back to top button