T20 World Cup Virat Kohli : विराट कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ तीन विश्वविक्रम! | पुढारी

T20 World Cup Virat Kohli : विराट कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ तीन विश्वविक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला आयसीसी टी 20 (ICC T20) विश्वचषक 2022 मध्ये तीन मोठे विश्वविक्रम करण्याची संधी आहे. विराट दोन विशेष प्रकरणांमध्ये कर्णधार रोहित शर्मालाही मागे टाकू शकतो. या मेगा स्पर्धेत टीम इंडियाला 23 ऑक्टोबरला आपला प्रवास सुरू करायचा आहे. या दिवशी भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी महामुकाबला आहे. विराट कोहलीने आशिया चषकापूर्वी मोठा ब्रेक घेतला होता. यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. विराटचा फॉर्म पाहता तो या मेगा टूर्नामेंटमध्ये तुफानी खेळी करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते. विराट कोणते तीन विश्वविक्रम मोडू शकतो यावर एक नजर टाकूया.

1. सर्वाधिक टी 20 आंतरराष्ट्रीय धावा

सध्या रोहित या बाबतीत आघाडीवर आहे. त्याच्या खात्यात 3737 टी 20 आंतरराष्ट्रीय धावांची नोंद आहे. विराट कोहली त्याच्यापेक्षा थोडा मागे आहे. विराटच्या खात्यात 3712 धावा आहेत. दोघांच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर विराट सध्या रोहितपेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि अशा परिस्थितीत तो लवकरच हा विश्वविक्रम करू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (T20 World Cup Virat Kohli )

2. सर्वाधिक चौकार

टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहली दोन खेळाडूंच्या मागे आहे. पॉल स्टर्लिंगच्या खात्यात 344 चौकार आहेत, तर रोहितच्या खात्यात 337 चौकार आहेत. विराट कोहली 331 चौकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आपला फॉर्म कायम ठेवला तर तो या विशेष विक्रमात नंबर-1 बनू शकतो.

3. ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम विदेशी फलंदाजांची सरासरी

विराटला ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर खेळणे किती आवडते, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. ऑस्ट्रेलियन भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये परदेशी फलंदाजांच्या कामगिरीबद्दल चर्चा करायची झाल्यास, यात सरासरीच्या बाबतीत फक्त इफ्तिखार अहमद, असाला गुणरत्ने आणि जेपी ड्युमिनी विराटच्या पुढे आहेत. गुणरत्ने आणि ड्युमिनी या टी 20 विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत. दुसरीकडे इफ्तिखार पाकिस्तानकडून खेळणार असला तरी त्याचा फॉर्म काही खास नाही. विराटने ऑस्ट्रेलियामध्ये 64.42 च्या सरासरीने एकूण 451 टी 20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. सरासरीच्या बाबतीतही तो नंबर-1 बनू शकतो.

Back to top button