FIFA World Cup : वर्ल्ड कपच्या आधी ब्राझीलला लॉटरी! | पुढारी

FIFA World Cup : वर्ल्ड कपच्या आधी ब्राझीलला लॉटरी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA World Cup : जगभरातील चाहते सध्या या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपची वाट पाहत आहेत. क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या मानल्या जाणा-या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे यावेळी कतारमध्ये आयोजन केले आहे. जगभरातील प्रत्येक क्रीडा चाहत्याची नजर या स्पर्धेवर असते, त्यामुळे यंदा कोणता संघ फिफा ट्रॉफी जिंकतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण यंदाच्या स्पर्धेपूर्वी पाच वेळचा चॅम्पियन संघ ब्राझीलसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

ब्राझीलचा संघ अव्वल स्थानी

गुरुवारी फिफाने क्रमवारी जाहीर केली. यात ब्राझीलने दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर उडी घेत बेल्जियमला मागे टाकले. ब्राझीलने सप्टेंबरमध्ये घाना आणि ट्युनिशियाविरुद्धचे दोन सराव सामने जिंकले, तर नेशन्स लीगच्या दोनपैकी एका सामन्यात बेल्जियमचा नेदरलँड्सकडून पराभव झाला होता. अर्जेंटिना तिसऱ्या क्रमांकावर असून 2018 चा वर्ल्ड कप विजेता फ्रान्स चौथ्या स्थानावर आहे. (FIFA World Cup)

कतार 50 व्या क्रमांकावर

यजमान कतार आपला शेजारी देश सौदी अरेबिया (51 क्रमांकावर) पेक्षा फक्त एक स्थान पुढे असून त्यांनी 50 वा क्रमांक पटकावला आहे. घाना 61 व्या स्थानावर राहत वर्ल्ड कपच्या क्रमवारीतील शेवटचा संघ ठरला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील गट ब हा क्रमवारीनुसार अतिशय मजबूत आहे. या गटातील सर्व चार संघ हे अव्वल 20 मध्ये आहेत. यात इंग्लंड (5वा), अमेरिका (16वा), वेल्स (19वा) आणि इराण (20वा) या संघांचा समावेश आहे. इटलीच्या संघाला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पण वर्ल्ड कपसाठी पात्र न ठरताही सर्वोच्च क्रमवारीत 10 च्या आत पोहचलेला तो एकमेव संघ ठरला आहे. (FIFA World Cup)

सातव्या क्रमांकावर स्पेन

स्पेनची एका स्थानाने घसरण झाली आहे. हा संघ सातव्या क्रमांकावर आहे. तर नेदरलँड, पोर्तुगाल आणि डेन्मार्कचे यांच्या क्रमवारीत बदल झालेले नाहीत. त्याचवेळी 2014 चा चॅम्पियन जर्मनी 11 व्या स्थानावर आहे. 2022 मध्ये एकही मान्यताप्राप्त सामने खेळले नसतानाही रशिया दोन स्थानांनी 33व्या स्थानावर पोहोचला आहे. युक्रेनवर झालेल्या हल्ल्यामुळे रशियन संघाला निलंबित करण्यात आले होते. (FIFA World Cup)

 

Back to top button