Matthew Wade Contoversy : ऑस्ट्रेलियन फलंदाजाची बेईमानी! झेल पकडत असलेल्या इंग्लिश खेळाडूला दिला धक्का (Video) | पुढारी

Matthew Wade Contoversy : ऑस्ट्रेलियन फलंदाजाची बेईमानी! झेल पकडत असलेल्या इंग्लिश खेळाडूला दिला धक्का (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Matthew Wade Contoversy : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना 9 ऑक्टोबर रोजी पर्थ स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने शानदार फलंदाजी करत 208 धावांचा डोंगर उभा केला, ज्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाने कडवी झुंज दिली पण त्यांना सामन्यात 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पराभवासोबतच मॅथ्यू वेडच्या बेईमानीचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लाइव्ह मॅचमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजा सोबत केलेल्या या बेईमानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा संघ (AUS vs ENG) शानदार फलंदाजी करताना सामना जिंकण्याच्या इराद्याने पुढे वाटचाल करत होता. 17 षटक सुरू होते. सलामीला आलेला वॉर्नर स्ट्राइकवर होता. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. आता क्रीजवर यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड आला. दुसरा चेंडू डॉट गेला. वेडने पुढच्या म्हणजे तिस-या चेंडूवर पुल शॉट खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळला आणि उंच हवेत गेला. वेड धाव घेण्यासाठी क्रिज सोडून पुढे धावला. पण त्याला लगेच समजले की चेंडून आपल्या डोक्यावर उंच हवेत उडाला आहे. त्यातच गोलंदाज मार्क वुड झेल पकडण्याच्या इराद्याने वेडच्या दिशेने धावला. त्याचवेळी विकेटच्या मागून विकेटकीपरही पुढे सरसावला होता. पण मॅथ्यू वेडने क्रिजमध्ये माघारी जाण्याच्या बहाण्याने वळण घेतले आणि आपला डावा हात लांब पसरून गोलंदाज वुडला खेळपट्टीवरच धक्का दिला. आपल्या जणू काही चेंडू दिसलाच नाही अशा आविर्भावात वेड या घटनेनंतर वावरत असल्याचे पहायला मिळाले. (Matthew Wade Contoversy)

इंग्लंड संघाकडून ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’चे अपील नाही…

मॅथ्यू वेडने जाणूनबुजून गोलंदाजाला खेळपट्टीवर रोखले आणि झेल पकडण्यात अडथळा निर्माण केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अशा स्थितीत इंग्लंडचा कर्णधार बटलर आणि गोलंदाज मार्क वुड यांच्याकडे ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’चे अपील करण्याची संधी होती पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे एकप्रकारे लाईव्ह सामन्यात बेईमानी केलेल्या वेडला जीवदान मिळाले. इंग्लिश खेळाडूंनी अपील केले असते तर मैदानी पंच ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ नियमानुसार (ICC नियम 37.1) वेडला बाद घोषित करू शकले असते. आयसीसीच्या नियमांनुसार, एखादा फलंदाज जाणूनबुजून खेळपट्टीवर चेंडूच्या मार्गात आला किंवा खेळाडूला झेल पकडण्यापासून रोखल्याचे आढळून आल्यास, त्याला बाद घोषित केले जाऊ शकते.

जर सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंड संघाने चांगली सुरुवात केली. दोन्ही सलामीवीर अॅलेक्स हेल्स (84 धावा) आणि कर्णधार जोस बटलर (68) यांनी अर्धशतकी खेळी साकारून संघाला 132 धावांची जबरदस्त सलामी दिली. पण त्यानंतर एकाही फलंदाजाला ही दमदार सुरुवात सांभाळता आली नाही. 11 षटकांत 132 धावा असतानाही संपूर्ण संघ 208 धावाच करू शकला. Matthew Wade Contoversy

यानंतर लक्ष्य गाठण्यासाठी कांगारूंची सुरुवातच कोलमडलेली पाहायला मिळाली. मात्र, डेव्हिड वॉर्नरने 44 चेंडूत 73 धावा केल्या. त्याचवेळी कॅमेरून ग्रीन आणि कर्णधार फिंच स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मार्कस स्टोनिसने 15 चेंडूत 35 धावा आणि मॅथ्यू वेडने 15 चेंडूत 21 धावा करत विजयाची शक्यता वाढवली. पण ऑस्ट्रेलियाला नऊ गडी गमावून केवळ 200 धावा करता आल्या आणि त्यांनी अवघ्या 9 धावांनी सामना गमावला. इंग्लंडकडून मार्क वुड हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत 34 धावा देवून 3 बळी घेतले. रीस टोपली-सॅम करणने 2-2 बळी घेतले. फिरकीपटू आदिल रशीदला एक बळी मिळवण्यात यश आले.

Back to top button