पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या निवडीवर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली संघात पृथ्वी शॉला स्थान दिले नाही. या संघात शुभमन गिल, संजू सॅमसन, इशान किशन, रजत पाटीदार यांसारख्या युवा फलंदाजांचा समावेश आहे, परंतु शॉला संधी मिळाली नाही.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शॉने संघात निवड न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली, यावेळी तो म्हणाला, "संघात स्थान न मिळाल्यामुळे मी निराश झालो आहे. मी संघासाठी धावा करत आहे, खूप मेहनत घेत आहे, पण संधी मिळत नाही. पुढे शॉ म्हणाला, "जेव्हा त्यांना (निवड समितीला) वाटेल की मी संघात खेळण्यासाठी तयार आहे, तेव्हा ते मला संघात स्थान देतील. मला जी काही संधी मिळेल, मग ती भारत 'अ'साठी असो किंवा इतर संघांसाठी तेव्हा मी माझा सर्वोत्तम देण्याचे प्रयत्न करेन आणि माझा फिटनेस कायम राखेन. (Prithvi Shaw )
यावेळी पृथ्वी म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीत वेगवेगळ्या गोष्टींवर काम केले नाही, पण फिटनेसवर खूप काम केले आहे. मी मागील आयपीएलनंतर सात ते आठ किलो वजन कमी केले. त्यासाठी मी व्यायामशाळेत बराच वेळ कष्ट केले आहेत.
येत्या काळात शॉ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेच्या तयारी बाबत त्याला विचारले असता पृथ्वी शॉ ने सांगितले "आम्ही काही सराव सामने खेळलो. सर्व खेळाडू सुस्थितीत आहेत. आमच्याकडे चांगले अष्टपैलू, फलंदाज आणि गोलंदाज आहेत. मला वाटते की हा संघ खूप मजबूत आहे. सर्व सहाय्यक कर्मचारी आमच्या तयारीसाठी कठोर परिश्रम घेत आहेत. आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.
हेही वाचा;