टोकियो ; वृत्तसंस्था : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय दिव्यांग खेळाडूंनी इतिहास रचला. भारतीय नेमबाज आणि बॅडमिंटनपटूंनी एकाच दिवशी दोन सुवर्णपदके पटकावत नवा विक्रम नोंदविला. त्याबरोबरच त्यांनी वरील दोन्ही क्रीडा प्रकारात रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई करीत भारताच्या पदक तालिकेत चार पदकांची भर घातली. अशाप्रकारे स्पर्धेच्या अकराव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केली.
भारतीय चमूने या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत आतापर्यंत चार सुवर्ण, सात रौप्य व सहा कांस्य अशी एकूण 17 पदके पटकावली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा भारतासाठी आजपर्यंतची अत्यंत यशस्वी क्रीडा मोहीम ठरली आहे.
येथे सुरू असलेल्या टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेचा अकरावा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. नेमबाज मनीष नरवालने नेमबाजीतील एसएच-1 प्रकारातील 50 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर सिंहराज अधानाने याच प्रकारात रौप्यपदकाला गवसणी घातली.
नेमबाजीच्या अंतिम फेरीत मनीष नरवालने 209.1 गुणांची नोंद करत सुवर्णपदकाचा वेध घेतला, तर सिंहराजने 207.3 गुणांसह रौप्यपदक पटकावले. मात्र, तत्पूर्वी झालेल्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये सिंहराजने चमक दाखवत चौथे, तर नरवालने सातवे स्थान पटकावले होते. मात्र, अंतिम फेरीत नरवालने बाजी मारत सुवर्णपदक पटकावले, तर सिंहराजने रौप्यपदक जिंकले. त्याने यापूर्वी 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. अशाप्रकारे आजचे रौप्य हे सिंहराजचे स्पर्धेतील दुसरे पदक ठरले.
बॅडमिंटनमध्येही भारताने सुवर्णमय कामगिरी नोंदविली. भारताच्या प्रमोद भगतने एसएल 3 प्रकारात सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने अंतिम सामन्यात ब्रिटनच्या डॅनिएल बेेथेल याचा 21-14, 21-17 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या सामन्यात भगतने आपल्या शानदार फटक्यांच्या जोरावर बेथेलला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. याच प्रकारातील कांस्यपदक मनोज सरकारने पटकावले. त्याने तिसर्या स्थानासाठी झालेल्या चुरशीच्या लढतील यजमान जपानच्या दाईसुके फॉजिहारा याचा 22-20, 21-13 असा धुव्वा उडविला.
भारतीय चमूने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 17 पदके पटकावली आहेत. यापूर्वी एकूण 53 वर्षांत भारताने 11 पॅरालाम्पिकमध्ये केवळ 12 पदके जिंकली होती. 1960 पासून ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. भारताने 1968 पासून भाग घेण्यास सुरुवात केली आहे, तर 1976 व 1980 मध्ये भारताने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. यंदाच्या टोकियो स्पर्धेत आतापर्यंत भारताने 4 सुवर्ण, 7 रौप्य व 6 कांस्यपदके पटकावली आहेत.
पहिल्यांदाच यावेळी पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनचा समावेश करण्यात आला. यामध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले आहे. प्रमोद भगतशिवाय एसएल-4 मध्ये नोएडाचे डीएम सुहास यथिराज व एचएस-6 प्रकारात कृष्णा नागर यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून पदके निश्चित केली आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या लढती रविवारी होत आहेत. कृष्णाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित करताना ग्रेट ब्रिटनच्या वर्ल्ड नंबर-5 चा खेळाडू क्रिस्टन कूब्सचा 21-10, 21-11 असा धुव्वा उडवत पदक निश्चित केले. सुहासची गाठ मजूर लुकासविरुद्ध भिडणार आहे, तर याच प्रकाराच्या कांस्यपदकासाठी तरुण ढिल्लोची गाठ इंडोनेशियाच्या सेतियावानशी पडणार आहे.
पाटणा : प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावत बिहारबरोबरच देशाचाही मान वाढविला. प्रमोद हा बिहारमधील हाजीपूरचा. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्याला पोलिओ झाला. त्यामुळे वडिलांच्या बहिणीने प्रमोदला उपचारासाठी ओडिशाला आणले. त्याने आपल्या शारीरिक कमजोरीच आपली ताकद बनवून बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली.
प्रमोदचे वडील राम भगत हे गावातच राहून शेती करतात. ते म्हणतात की, प्रमोदला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. तो सर्वांनाच पराभूत करत असे. मात्र, वयाच्या पाचव्या वर्षी त्याला पोलिओ झाला. सर्वजण निराश झाले. मात्र, बहीण किशुनी देवी व कैलाश भगत यांनी प्रमोदला दत्तक घेत त्याला भुवनेश्वरमध्येच ठेवून घेतले.
तेव्हापासूनच त्याने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. 2006 मध्ये ओडिशा संघात, तर 2019 मध्ये राष्ट्रीय संघात त्याची निवड झाली होती. 2019 मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार व ओडिशा सरकारच्या वतीने बीजू पटनाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.