T20 World Cup : रोहित शर्मा रचणार धोनी सारखा इतिहास, पण… | पुढारी

T20 World Cup : रोहित शर्मा रचणार धोनी सारखा इतिहास, पण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2022 Rohit Sharma Team India : टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवड समितीने सोमवारीच संघाची घोषणा केली. रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. याची शक्यता आधीच वर्तवली गेली होती. निवडकर्त्यांनी आशिया कप संघात थोडेफार बदल केले असून हा संघ समतोल असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. टीम इंडियाने 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता, परंतु त्यानंतर भारतीय संघाने एकदाही हे विजेतेपद पटकावले नाही. आता रोहित शर्माकडून हा दुष्काळ संपेल अशी अपेक्षा आहे.

टीम इंडियाने 2007 मध्ये पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला…

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकून 15 वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला आहे. आता निवड झालेले 15 खेळाडू पुन्हा ट्रॉफी जिंकण्यासाठी जिद्दीने मैदानात उतरतील अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. आता प्रश्न असा आहे की, धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जेतेपद पटकावले तेव्हा संघात अनेक युवा खेळाडू होते, ज्यांची नव्या संघात निवड झाली होती आणि त्यांना काहीतरी करण्याची इच्छा होती. धोनीप्रमाणेच रोहित शर्माच्या संघात अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांची काही दिवसांपूर्वीच भारतीय संघात निवड झाली आहे. ते भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्या वर्षीच्या टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार एमएस धोनी स्वतः तरुण होता. त्याच्याशिवाय युवराज सिंग, पियुष चावला, गौतम गंभीर, हरभजन सिंग, जोगिंदर शर्मा, दिनेश कार्तिक, इरफान पठाण, रोहित शर्मा आणि आरपी सिंग या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला होता, जे युवा क्रिकेटर होते. आणि काही वर्षांपूर्वीच भारतीय सघात आले होते. (T20 World Cup 2022 Rohit Sharma Team India)

यावेळीही टीम इंडियात युवा खेळाडूंची फौज

ऑस्ट्रेलियातील खेळवल्या जाणा-या टी 20 वर्ल्ड कपसाठी यावेळी जी टीम इंडिया निवडली गेली आहे, त्याचा कर्णधार रोहित शर्मा आहे. पण त्याला युवा क्रिकेटर म्हणता येणार नाही. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली अनेक युवा खेळाडू खेळणार आहेत. यात दीपक हुडा, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर केएल राहुल, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे अनुभवी खेळाडूही संघात कायम आहेत. (T20 World Cup 2022 Rohit Sharma Team India)

2007 साली ज्येष्ठ खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली होती…

2007 च्या वर्ल्ड कपची एक खास गोष्ट अशी होती की, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांसारखे दिग्गज खेळाडू निवृत्त झाले नव्हते. त्याचवेळी क्रिकेटमध्ये टी-20 फॉरमॅटचे आगमन झाले होते. पण भारताच्या त्या दिग्गज खेळाडूंनी मोठे मन दाखवत आपले नाव त्या स्पर्धेतून मागे घेतले. त्यामुळे युवा खेळाडूंचा मार्ग मोकळा झाला. विशेष बाब म्हणजे 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेआधी काही महिन्यांपूर्वी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वाईटरित्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत तत्कालीन संघातील दिग्गज खेळाडूंचे लक्ष एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर अधिक होते. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांना नवीन संघ तयार करण्याची संधी होती आणि तसेच झाले. धोनीच्या नेतृत्वाखाली नव्या टी 20 संघाची बांधणी करण्यात आली. अखेर त्या स्पर्धेच्या शेवटी काय इतिहास रचला गेला हे सर्वांना माहिती आहे. मात्र, यावेळी कोणत्याही ज्येष्ठ खेळाडूने अगामी ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणा-या वर्ल्ड कप स्पर्धेतून आपले नाव मागे घेतलेले नाही. पण तरीही या संघात युवा आणि ज्येष्ठ अनुभवी खेळाडूंचा चांगला मिलाफ आहे. (T20 World Cup 2022 Rohit Sharma Team India)

आता आशिया कप स्पर्धेतील पराभव विसरून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी रोहित ब्रिगेटला ही एक सुवर्णसंधीच आहे. पाहुण्या संघांविरुद्ध मालिका जिंकून संघाचा आत्मविश्वास दुणावेल आणि जेणेकरून पुन्हा एकदा वर्ल्ड कपची ट्रॉफी भारतात येईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

2007 च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अशी होती…

एमएस धोनी, युवराज सिंग, अजित आगरकर, पियुष चावला, गौतम गंभीर, हरभजन सिंग, जोगिंदर शर्मा, दिनेश कार्तिक, युसूफ पठाण, इरफान पठाण, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, आरपी सिंग, एस श्रीशांत, रॉबिन उथप्पा.

2022 च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अशी आहे…

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Back to top button