

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Asia Cup 2022 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यातील वाद आता उघड होऊ लागल्याचे दिसत आहे. आशिया चषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात रोहित ब्रिगेडने पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव केला. मात्र, त्यानंतर सुपर 4 फेरीत भारतीय संघाने सलग दोन सामने गमावले. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका संघांची सरशी झाली. आता सुपर 4 फेरीत टीम इंडियाचा अजून एक सामना बाकी आहे. भारतीय संघ आपला शेवटचा सामना 8 सप्टेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
रोहित शर्मा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर पहिल्यांदाच त्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. संघ आतापर्यंत दोन देशांमधील मालिका खेळत होता, मात्र बहुराष्ट्रीय मोठी स्पर्धा सुरू होताच टीम इंडियाची पोल खोल झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, टीम इंडियामध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे, संघ कोणत्याही नियोजनाशिवाय मैदानात उतरत आहे आणि सामन्याच्या मध्यंतरात काहीही निर्णय घेतले जात असल्याची चर्चा सुरू आहे. (Team India)
मंगळवारी जेव्हा टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध सुपर 4 फेरीतील सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा रोहित शर्मा आणि केएल राहुलने डावाला सुरुवात केली. यानंतर माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आला. यानंतर कोणता खेळाडू यायला हवा हा निर्णय सामन्याच्या मध्यंतरात घेण्यात आला. जर तुम्ही सामना पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की जेव्हा रोहित शर्मा 72 धावा करून बाद झाला तेव्हा ऋषभ पंत जवळजवळ तयारच होता, पण अचानक हार्दिक पंड्याला फलंदाजीला जाण्याचे संकेत मिळाले. असे दिसते की हार्दिक पंड्यालाही या निर्णयाचा धक्का बसला. म्हणजेच हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर आला आणि यानंतर ऋषभ पंतला सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आले. याआधी जेव्हा सुपर 4 फेरीतील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला गेला तेव्हा पंतला पाचव्या क्रमांकावर पाठवले गेले होते, त्यानंतर हार्दिकचा क्रमांक होता. (Team India)
पंड्या-पंत हे दोघेही पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विशेष काही करू शकले नाहीत. ऋषभ पंतने पाकिस्तानविरुद्ध 12 चेंडूत 14 धावा केल्या, तर हार्दिक पंड्या दोन चेंडू खेळला आणि शुन्यावर तंबूत परतला. यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पंड्या आणि पंत या दोघांनी 13 चेंडूत 17 धावा केल्या आणि ते बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. जवळपास प्रत्येक सामन्यात फलंदाजांच्या क्रमामध्ये बदल केला जात आहे. (Team India)
कोणत्याही खेळाडूला माहिती नाही आपल्याला फलंदाजीसाठी मैदानात कधी उतरायचे आहे. ही बाब गुपित असल्याचे दिसते. याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवरही होत असल्याचे माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. टीम इंडियासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे 2022 चा टी-20 विश्वचषकही याच वर्षी ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे आणि त्यापूर्वी हीच परिस्थिती राहिल्यास भारतीय संघासमोरील अडचणी आणखी वाढू शकतात. याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामने खेळणार आहे, ज्याला 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून पाहिले जात आहे.