पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक काही दिवसांवर असताना भारतीय संघासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला टी-२० विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. जडेजा आशिया चषक स्पर्धेतून गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. रवींद्र जडेजा आशिया चषक स्पर्धेत ग्रुप स्टेजच्या सामन्यात खेळला. पंरतु, दुखापतीमुळे सुपर ४ मध्ये होणारे सामने त्याला खेळता येणार नाहीत. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली होती. उर्वरित सामने त्याला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. (T20 World Cup 2022)
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, जडेजाच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे रवींद्र जडेजा अनिश्चित काळासाठी भारतीय संघाकडून खेळू शकणार नाही. राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीने जडेजाबाबत दिलेला अहवाल चितेंत टाकणारा आहे. या अहवालामुळे रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषकाला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (T20 World Cup 2022)
रवींद्र जडेजाला दुखापतीतून बरे होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी शक्यता राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीने दिलेल्या अहवालानंतर व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीतून सावरू शकलेला नाही. याच कारणामुळे जडेजा गेल्या वर्षापासून स्वत:ला बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. गोलंदाजी करताना गुडघ्यावर मोठा ताण पडत असतो, त्यामुळेच जडेजा डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरू शकलेला नाही. (T20 World Cup 2022)