Asia Cup 2022 : ‘सुपर फोर’मधील सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्मा सापडला अडचणीत! | पुढारी

Asia Cup 2022 : ‘सुपर फोर’मधील सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्मा सापडला अडचणीत!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma in Trouble : आशिया कप 2022 चा थरार क्रिकेट चाहत्यांमध्ये शिगेला पोहचला आहे. आज (दि. 2) साखळी टप्प्यातील शेवटचा सामना पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. हा नॉकआऊट सामना आहे, म्हणजेच जो संघ जिंकेल तो ‘सुपर फोर’मध्ये जाईल आणि पराभूत संघाचा आशिया कपमधील प्रवास संपुष्टात येईल. भारत आणि पाकिस्तानचे संघ 4 सप्टेंबरला पुन्हा आमनेसामने येणार की नाही हेही आजच्या सामन्यातून स्पष्ट होईल.

जर पाकिस्तानने हाँगकाँगला पराभूत केले तर हा संघ अ गटात दुस-यास्थानी राहील. म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी याच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल. मात्र पाकिस्तानी संघ पराभूत झाला तर भारताचा सामना पुन्हा हाँगकाँगशी होईल. मात्र, हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे पारडे जड आहे. त्यामुळे हा सामना जिंकून बाबर आझमचा संघ सुपर 4 मध्ये आपले स्थान पक्के करेल, अशी अनेक क्रिकेट तज्ज्ञांना खात्री आहे. (Rohit Sharma in Trouble)

दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया सुपर फोरमध्ये 4 मध्ये

दरम्यान, जर आपण ‘सुपर फोर’ मधील टीम इंडियाच्या वेळापत्रकाबद्दल बोललो, तर भारताला 4 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळायचा आहे, जो पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. दरम्यान, या पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला अडचणीत आल्याची जोरदार चर्चा आहे. याचे कारण अगदी स्पष्ट आहे. टीम इंडियाने पाक विरुद्धचा पहिला साखळी सामना जिंकल्यानंतर हाँगकाँग विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात संघात फक्त एक बदल करण्यात आला. हार्दिक पांड्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती आणि त्याच्या जागी ऋषभ पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. आता 4 सप्टेंबरला भारताची पाकिस्तानशी गाठ पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हार्दिक पंड्या प्लेईंग इलेव्हनमध्ये नक्कीच पुनरागमन करेल. पण मग बाहेर कोण बसणार? याबाबत शंका निर्माण झाली आहे. (Rohit Sharma in Trouble)

दिनेश कार्तिक-ऋषभ पंतपैकी कुणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान?

दिनेश कार्तिक आतापर्यंत दोन्ही सामने खेळला आहे. पाक विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने एका चेंडूवर एक धाव केली. तो नाबाद राहिला. तसेच भारताच्या फिल्डिंगवेळी त्याने विकेटच्या मागे तीन झेल घेतले आणि पाकच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. दुसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पहिल्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळालेला ऋषभ पंत दुस-या सामन्यात मिअदानात उतरला. पण त्यालाही फलंदाजीसाठी मैदानात उतरता आले नाही. तसेच प्रतिस्पर्धी हाँगकाँग संघाची विकेट घेण्यात त्याला फारशी संधी मिळाली नाही. आता टीम इंदिया पुन्हा एकदा पाकिस्तानला भीडणार आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाचा समावेश करायचा हे कर्णधार रोहित शर्माला ठरवावे लागणार आहे. (Rohit Sharma in Trouble)

कार्तिक आणि पंत या दोघांनाही प्लेईंग इलेव्हनमद्ये खेळवायचे असेल तर दुसऱ्या एखाद्या खेळाडूला बाहेर बसवावे लागेल. यात केएल राहुलचे नाव आघाडीवर आहे. कारण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात राहुल दुस-याच चेंडूवर खाते न उघडता माघारी परतला. तसेच दुसऱ्या सामन्यातही तो काही खास प्रदर्शन करू शकलेला नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन राहुलला प्लेईंग इलेव्हनमध्ये ठेवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 4 सप्टेंबरनंतर 6 आणि 8 सप्टेंबरला भारतीय संघाला सुपर फोरमधील सामने खेळायचे आहेत. यात संघाला अफगाणिस्तान आणि श्रीलंकेशी सामने खेळायचे आहेत.

Back to top button