

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Asia Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कप 2022 साठी यूएईला पोहोचली आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसर्यांदा जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. याआधी 2018 मध्ये आशिया कप खेळला गेला तेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचा हंगामी कर्णधार होता. रोहितच्या नेतृत्वाखाली त्यावेळी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यावेळी रोहित ब्रिगेडने जेतेपद पटकावले तर विजयाची दुसरी हॅट्ट्रिक पूर्ण होणार आहे.
2021 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20 संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर बीसीसीआयने रोहित शर्माची नवीन कर्णधार म्हणून निवड केली. त्यामुळे पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्मा पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत खेळणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा त्याच्या फलंदाजीकडे असून एक कर्णधार म्हणून तो कसा निर्णय घेतो हेही पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र, पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माचे आकडे पाहता पाकिस्तान संघाला नक्कीच धडकी भरेल. तसेच रोहितनेही त्याच्या यशस्वी नेतृत्वाची वाटचाल कायम ठेवल्यास 28 ऑगस्ट रोजी होणा-या सामन्यात टीम इंडिया पाकिस्तानचा पराभव निश्चितच करेल यात शंका नाही.
नोव्हेंबर 2021 मध्ये रोहित शर्मा टी 20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाला. तेव्हापासून, त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 14 सामन्यांमध्ये रोहित ब्रिगेडने विजय मिळवला असून दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोनपैकी एका सामन्यात इंग्लंड आणि दुस-या सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियावर मात केली आहे. आता 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे, तेव्हा रोहित शर्मा कर्णधार म्हणून 15 वा सामना खेळण्यास मैदानात उतरणार आहे. या सामन्यात रोहित ब्रिगेड कशी कामगिरी करणार याकडे अवघ्या जभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
नोव्हेंबर 2021 नंतर रोहित शर्मा जरी पूर्णवेळ कर्णधार झाला असला तरी त्याआधीही त्याने हंगामी कर्णधारपद भूषवले आहे. तत्कालीन कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे ज्या सामन्यात खेळू शकत नव्हता तेव्हा टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहितच्या खांद्यावर दिली जायची. अशाप्रकारे रोहितने आतापर्यंत 31 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले असून त्यापैकी 26 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे आणि पाचमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. म्हणजेच त्याच्या विजयाची टक्केवारी 83.87 इतकी आहे.
रोहित शर्माचे हे आकडे तो एक यशस्वी कर्णधार आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील सामन्यापूर्वीच पाकिस्तान संघाला घाम फुटल्याची चर्चा आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा आशियाचा बादशाह बनून सलग तिसऱ्यांदा आशिया चषक ट्रॉफी उंचावणार असा विश्वासही क्रिकेट तज्ज्ञांसह चाहत्यांना आहे. यापूर्वी 2016 मध्ये एमएस धोनी आणि 2018 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हे विजेतेपद पटकावले आहे. (Rohit Sharma Asia Cup)