ठाणे : नोटीस बजावूनही विचारे, केदार दिघेंची सोहळ्याला हजेरी | पुढारी

ठाणे : नोटीस बजावूनही विचारे, केदार दिघेंची सोहळ्याला हजेरी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगणार होता.

उद्धव ठाकरे गटात असलेल्या राजन विचारे, केदार दिघे यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या असतांना देखील या कार्यक्रमाला उपस्थिती
लावली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आल्याने काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र
सुदैवाने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी
महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 12 वाजता ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केले. यावेळी शेकडो नागरिक या कार्यक्रमाला
उपस्थित होते. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती.
तीच परंपरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवली आहे. मात्र या कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटातील ठाण्याचे
खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना नोटीस बजावली होती. मात्र यानंतरही राजन विचारे आणि केदार दिघे या
कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता. मात्र सुदैवाने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही. ध्वजारोहणाचा
कार्यक्रम झाल्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची
लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा देतो, असे त्यांनी सांगितले. तसेच आनंद दिघे यांनी ही
ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले

या मंत्र्यांवर ज्या खात्याची जबाबदारी दिली ते योग्य पार पाडतील- शिंदे

मंत्री मंडळाचा विस्तार करीत अखेर 18 मत्र्यांनी शपथ देखील घेतली आहे. त्यानंतर त्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. त्याच खातेवाटपावरून सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यावर शिंदे यांना प्रश्न विचारला असता, खाते कोणते आहे, या पेक्षा आपण न्याय
कसा देतो, हे महत्वाचे आहे. त्यामुळे ज्या विभागाची जबाबदारी ज्या मंत्र्यांवर दिली आहे, ते नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एकदा मंत्री झाल्यानंतर तो एका विशिष्ट भागाचा मंत्री नसतो, तो राज्याचा मंत्री असतो, त्यांच्याकडून सर्वसमावेश आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कामही होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

कोणावरही कारवाई करू नका !
राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या उपस्थितीबाबतही पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला असता, ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचं आहे, त्यांना येऊ द्या, राजन विचारे यांच्या समवेत कोणावरही कारवाई करू नका, असे पोलिसांना सांगितले असल्याचे
त्यांनी सांगितले.

Back to top button