CWG 2022 : ब्राॅन्झपदक जिंकूनही पूजा गेहलोतने मागितली देशाची माफी, पण पीएम मोदी म्हणाले... | पुढारी

CWG 2022 : ब्राॅन्झपदक जिंकूनही पूजा गेहलोतने मागितली देशाची माफी, पण पीएम मोदी म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : CWG 2022 : बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकतालिकेत वाढ होत आहे. काल तर कुस्तीपटूंनी पदकांचा पाऊस पाडला. पण याचदरम्यान, कुस्तीपटू पूजा गेहलोतने (pooja gehlot) 50 किलो वजनी गटात कुस्तीमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकूनही देशाची माफी मागितली. सुवर्णपदक पटकावण्यात अपयशी ठरल्याबद्दल ती भावूक झाली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिला प्रोत्साहन देत तिला सावरण्यात मोलाची भूमिका बजावली.

ब्रान्झपदक जिंकल्यानंतर पूजा गेहलोतने (pooja gehlot) मीडियाशी संवाद साधला. तेव्हा तिने सर्वांची माफी मागितली. पूजा गेहलोत म्हणाली की, मी हरले, याचे मला दुःख आहे. मी देशवासीयांची माफी मागते. मला सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा होती, पण मी अपयशी ठरले. मला आता ब्रान्झपदक मिळाले आहे, मी माझ्या चुकांवर काम करेन,’ अशी आशा विश्वास तिने देशवासीयांना दिला. (CWG 2022)

पूजा (pooja gehlot) भावूक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले की पूजा, तू जे पदक मिळवले आहेस तो क्षण आनंद साजरा करण्याचा आहे ना की माफी मागण्याचा. तुझा जीवन प्रवास आम्हाला प्रेरणा देतो. तुझे यश आम्हाला आनंदित करते,’ असे त्यांनी म्हटले. (CWG 2022)

पूजा गेहलोतने ब्रान्झ पदकाच्या सामन्यात स्कॉटिश खेळाडूला 12-2 ने पराभूत केले. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कुस्तीमध्ये भारताचे खेळाडू चमकत असून पदकांची कमाई करत आहेत. या यादीत पूजाच्या नावाचाही समावेश झाला आहे.

Back to top button