CWG 2022 : अवघ्या 0.01 सेकंदामुळे हिमाचे स्वप्न भंगले | पुढारी

CWG 2022 : अवघ्या 0.01 सेकंदामुळे हिमाचे स्वप्न भंगले

बर्मिंगहॅम : एकीकडे भारतीय खेळाडू राष्ट्रकुल क्रीडा (CWG 2022) स्पर्धेत पदकांची लयलूट करत असताना, दुसरीकडे मात्र भारताची स्टार धावपटू हिमा दासचे पदकाचे स्वप्न अवघ्या 0.01 सेकंदाच्या फरकामुळे भंगले आहे. प्रयत्नांची पराकाष्टा करूनही हिमा दासला अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आलेला नाही. दुसर्‍या उपांत्य फेरीत ती तिसर्‍या स्थानावर राहिली, पहिल्या दोघी फायनल राऊंडसाठी पात्र ठरल्या.

22 वर्षीय स्टार धावपटू हिमा दास हिच्याकडून भारताला पदकाची आशा होती. मात्र, महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठता आली नाही. अवघ्या 0.01 सेकंदाच्या फरकामुळे दुसर्‍या उपांत्य फेरीत हिमा दासला पराभव स्वीकारावा लागला. हिमाने दुसर्‍या उपांत्य फेरीत 23.42 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले आणि अंतिम फेरी केवळ 0.01 सेकंदाच्या फरकाने गमावली. महिलांच्या 200 मीटर प्रकारात तीन उपांत्य फेरीचे सामने होते. ज्यापैकी अव्वल दोन धावपटूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला. (CWG 2022)

Back to top button