Commonwealth Games 2022 : गोल्ड जिंकलेल्या मीराबाई चानूचा फॅन झाला 'थॉर'; हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ याचे ट्विट व्हायरल | पुढारी

Commonwealth Games 2022 : गोल्ड जिंकलेल्या मीराबाई चानूचा फॅन झाला 'थॉर'; हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ याचे ट्विट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू (Indian weightlifter Mirabai Chanu) हिने बर्मिंगहममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात ही नेत्रदीपक कामगिरी केली. तिच्या या कामगिरीमुळे तिच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या कामगिरीचे ‘थॉर’ फेम हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ (Hollywood star Chris Hemsworth) यानेही कौतुक केले आहे.

‘थॉर’ नावाने प्रसिद्ध असलेल्या हेम्सवर्थने मार्व्हल यूनिव्हर्सच्या चित्रपटांत हातोड्याचा वापर केला आहे. हा हातोडा त्यांच्या फॅन्समध्ये खूप प्रसिद्ध आहे. सुवर्णपक जिंकल्यानंतर मीराबाई चानूने ट्विटरवर तिच्या सुवर्ण कामगिरीचे फोटो शेअर केले होते. मीराबाईच्या या फोटोंवर सौरभ सिन्हा नावाच्या एका यूजरने, ”आता वेळ आली आहे की थॉरने त्याचा हातोडा द्यावा.” (Time for Thor to give up his hammer) अशी कमेंट केली होती. त्याने हे ट्विट हेम्सवर्थला टॅग केले होते. आणि चक्क हेम्सवर्थने त्याला रिप्लाय देत भारतीय फॅन्सची मने जिंकली आहेत. हेम्सवर्थने लिहिले आहे की, ”ती त्यासाठी पात्र आहे! अभिनंदन, साईखोम, तू महान आहेस.”

चानूने त्यावर लगेच रिप्लाय देत कृतज्ञता व्यक्त केली. “तुमचे खूप खूप आभार @chrishamsworth तुम्हाला पाहण्यास नेहमीच आवडते.” असे चानूने म्हटले आहे.


मार्व्हल कॉमिक्स आणि त्याच्या सोबतच्या सिनेमॅटिक विश्वामध्ये थॉरचा हातोडा Mjolnir हे एक जादुई शस्त्र आहे; जे केवळ त्यासाठी पात्र आहेत तेच उचलू शकतात. हेम्सवर्थचे मीराबाई चानूच्या अभिनंदनाचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

(Commonwealth Games 2022) स्नॅच प्रकारात पहिल्याच प्रयत्नात चानूने चांगली सुरुवात केली आणि यशस्वीरित्या ८४ किलो वजन उचलले. चानूने आवश्यक असलेले ८८ किलो वजन काही सेकंदात यशस्वीरित्या उचलले. भारताचे प्रतिनिधित्व करताना तिने वैयक्तिक पातळीवर सर्वोत्तम कामगिरी केली. क्लीन अँड जर्क लिफ्ट प्रकारात चानूने पहिल्याच प्रयत्नात १०९ किलो वजन उचलून जबरदस्त ताकदीचे प्रदर्शन केले. दुसऱ्या प्रयत्नात तिने ११३ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले.

Back to top button