Commonwealth Games : भारताच्या मीराबाई चानूची राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी | पुढारी

Commonwealth Games : भारताच्या मीराबाई चानूची राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारतात पुरुष वेटलिफ्टर संकेत सरगर आणि गुरुराज पुजारी या दोघांनी देशाला अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई करून दिल्यानंतर महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने दिवसातील तिसरे पदक मिळवून देताना भारताच्या सुवर्णपदकाची सुरुवात केली.

मीराबाई चानू हिने हे मेडल मिळवताना ऐतिहासिक कामगिरी केली. तिने 88 किलो वजनाची उचल केल्यामुळे तिने स्वत:च्या वैयक्‍तिक रेकॉर्डशी बरोबरी केली. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सर्वोत्तम उचल केली. या आधी तिची सर्वोत्तम कामगिरी 87 किलो होती. तसेच, मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटाच्या स्नॅचमध्ये ही उचल करत नॅशनल रेकॉर्ड तर केलेच, पण त्यासोबत कॉमनवेल्थ गेम्समधील रेकॉर्डही तिने मोडले आणि नवा उच्चांक प्रस्थापित केला.

तिसर्‍या प्रयत्नात अपयश, तरीही सुवर्णपदकाचा मान

भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने 49 किलो वजनी गटात पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन उचलले. तिने पहिल्याच प्रयत्नात मोठी आघाडी घेतली आणि सुवर्णपदकासाठी दावा सांगितला. ती पहिल्या प्रयत्नानंतर सर्वात आघाडीवर होती. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात तर तिने 88 किलो वजनाची उचल केली. या प्रयत्नासोबतच तिने स्वत:च्या वैयक्‍तिक रेकॉर्डची बरोबरी केली आणि कॉमनवेल्थ गेम्समध्येही सर्वोत्तम उचल केली.

तिसर्‍या प्रयत्नासाठी मात्र मीराबाई चानूने 90 किलो वजनाची उचल करायचे ठरवले. तिचा हा प्रयत्न फसला, पण तरीही आधीच्या दोन प्रयत्नांच्या जोरावर ती स्पर्धेत टिकून राहिली. कारण, तिने दुसर्‍या क्रमांकाच्या वेटलिफ्टरपेक्षा 12 किलोंची आघाडी घेतली होती. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत मीराबाईने भारताला मोठे यश मिळवून दिले.

Back to top button