Rohit Sharma : ‘टी 20 वर्ल्ड कप’पूर्वी ‘या’ चार समस्यांनी वाढवली रोहितची डोकेदुखी! | पुढारी

Rohit Sharma : ‘टी 20 वर्ल्ड कप’पूर्वी ‘या’ चार समस्यांनी वाढवली रोहितची डोकेदुखी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कपचे आयोजन केले आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना सर्वच संघ मैदानावर घाम गाळत आहेत. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये टी-20 मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांव्यतिरिक्त भारताकडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आणखी जवळपास 10 हून अधिक सामने आहेत. विंडीजनंतर भारताला आशिया कप खेळायचा आहे जिथे टीम इंडिया किमान 5 सामने खेळेल, जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर सामन्यांची संख्या सहा होईल. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका तर त्यानंतर द. आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारताकडे फार कमी सामने शिल्लक आहेत, परंतु रोहित शर्माला (Rohit Sharma) या सामन्यांमध्ये त्याच्या चार मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्याची संधी आहे, ज्या काही काळापासून त्याची डोकेदुखी वाढवत आहेत. चला तर रोहितची डोकेदुखी बनलेल्या समस्या नेमक्या आहेत तरी काय..

सलामीवीर अद्याप निश्चित झालेले नाहीत…

केएल राहुलच्या दुखापतीनंतर रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) अनेक खेळाडूंनी सलामीवीर फलंदाजाची भूमिका पार पाडली आहे. मात्र रोहित सोडल्यास आतापर्यंत कोणत्याही इतर खेळाडूला आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. आशिया चषक 2022 मध्ये केएल राहुल पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे, परंतु विश्वचषकादरम्यान सलामीवीर जखमी झाल्यास बॅकअप सलामीवीर कोण असेल हा प्रश्न अजूनही कायम आहे. इशान किशनकडे बॅकअप सलामीवीर म्हणून पाहिले जाते, पण या खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 नंतर खेळण्याची संधी मिळाली नाही. इशानच्या जागी रोहित शर्माने ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंना डावाची सुरुवात करण्याची संधी दिली आहे.

विराट कोहलीचा फॉर्म

टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीचा फॉर्म सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये कोहली नेहमीच भारतीय फलंदाजीचा कणा राहिला आहे, परंतु सध्या कोहली अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीनंतर कोहलीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती मागितली होती, आता हा स्टार खेळाडू आशिया कपमध्येच खेळताना दिसणार आहे. अशा स्थितीत कोहलीला वर्ल्ड कप पूर्वी फॉर्ममध्ये येण्यासाठी फारसा वेळ नाही. जर कोहलीच्या बॅटमधून धावा येत राहिल्या तर तो भारतीय संघाला भेडसावणारी सलामीवीराची समस्या सोडवू शकतो. कारण टी 20 मध्ये सलामीवीर म्हणून त्याने चांगल्या धावा जमवल्या आहेत.

फिरकी जोडी (Rohit Sharma)

आर अश्विनचा टी 20 संघात अचानक प्रवेश झाल्याने इतर फिरकीपटूंना वर्ल्ड कप संघात स्थान मिळणे कठीण झाले आहे. टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात आहे, त्यामुळे संघ जास्तीत जास्त दोन फिरकीपटूंसोबत जाईल. रवींद्र जडेजाच्या फलंदाजीच्या क्षमतेमुळे त्याचे स्थान निश्चित झाले आहे, तर दुसऱ्या स्थानासाठी युझवेंद्र चहल आणि अश्विन यांच्यात लढत आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंचा संघ निवडला जाईल, त्यामुळे संघ अधिक फिरकीपटूंना जागा देण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता असल्याचे दिग्गजांचे मत आहे. अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादवसारखे फिरकीपटूही रांगेत आहेत.

तिसरा वेगवान गोलंदाज कोण?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय वेगवान आक्रमणाचे नेतृत्व अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह करेल. तर हार्दिक पंड्या अष्टपैलू म्हणून आपली भूमिका बजावेल. आता प्रश्न असा आहे की त्याच्याशिवाय दुसरा वेगवान गोलंदाज कोण असेल? या जागेसाठी अर्शदीप सिंग, आवेश खान, हर्षल पटेल यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. रोहित कोणत्या गोलंदाजासोबत जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आणखी वाचा :

Back to top button