आर. पी. सिंह यांचा मुलगा हॅरीची इंग्लंड अंडर-19 संघात निवड! | पुढारी

आर. पी. सिंह यांचा मुलगा हॅरीची इंग्लंड अंडर-19 संघात निवड!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह यांच्या (सिनियर) मुलाची इंग्लंड अंडर-19 संघात निवड झाली आहे. हॅरी सिंग असे त्याचे नाव आहे. तो श्रीलंका अंडर-19 संघाविरुद्धच्या मालिकेत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. याआधी आरपी सिंह यांची मुलगी लँकेशायरच्या अंडर-19 संघाकडूनही खेळली आहे. मात्र, त्यानंतर तिने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

आरपी सिंह हे मूळचे लखनौचे आहेत. त्यांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले होते. यानंतर, ते 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात इंग्लंडला गेले आणि तेथे लँकेशायर काउंटी क्लबला प्रशिक्षण देऊ लागले. त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डात प्रशिक्षकपदाची जबाबदारीही सांभाळली. त्याचा मुलगा हॅरी सिंग लँकेशायरच्या सेकंड इलेव्हन संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून भूमिका बजावतो. आरपी सिंह यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी आम्हाला ईसीबीकडून फोन आला की हॅरीची इंग्लंडच्या अंडर-19 संघात निवड झाली असून तो श्रीलंका संघाविरुद्धच्या मालिकेत संघाचा भाग असेल.’

‘हॅरीला उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल’

आरपी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जर त्यांच्या मुलाला उच्च स्तरावर पोहोचायचे असेल तर त्याला अनेक खडतर आव्हानांना सामोरे जावे लागेल. हे इतके सोपे नाही. टॉप लेव्हलवर पोहोचण्यासाठी तुम्हाला थोडे नशीब आणि भरपूर धावांची गरज आहे. मी 90 च्या दशकात असे अनेक क्रिकेटपटू पाहिले आहेत जे देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत होते पण भारतीय संघाकडून खेळताना ते सपशेल अपयशी ठरले. हॅरी जसजसा मोठा होत जाईल तसतसे त्याला त्याच्या फलंदाजीत तांत्रिक सुधारणा कराव्या लागतील,’ अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

Back to top button