बॅडमिंटन : भारताकडून पाकिस्तानचा सुफडासाफ | पुढारी

बॅडमिंटन : भारताकडून पाकिस्तानचा सुफडासाफ

भारताच्या बॅडमिंटनपटूंनीही पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. पी. व्ही. सिंधू, श्रीकांत किदम्बी या स्टार खेळाडूंनी मिश्र सांघिक गटाच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा 5-0 असा सुफडासाफ केला. भारतीय खेळाडूंसमोर पाकिस्तानचा निभावच लागला नाही. पाचही डावात भारताने 2-0 अशी सहज बाजी मारली.

अश्विनी पोनप्पा व बी सुमिथ रेड्डी यांनी मिश्र दुहेरीत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या मुहम्मद भट्टी व घझाला सिद्दीकी यांचा 21-9, 21-12 असा पराभव केला. किदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत पाकिस्तानच्या मुराद अलीचा 21-7, 21-12 असा सहज पराभव करून भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. त्यानंतर झालेल्या महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने 21-7, 21-6 अशा फरकाने महूर शहजादचा पराभव करताना भारताची आघाडी 3-0 अशी वाढवली आणि विजय पक्का केला. सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या सामन्यात पाकिस्तानी जोडी मुराद अली व इरफान सईद भट्टी यांनाही डोकं वर काढू दिलं नाही. भारतीय जोडीने 21-12, 21-9 असा विजय मिळवला. महिला दुहेरीच्या लढतीत ट्रीसा जॉली व गायत्री गोपिचंद या जोडीने 21-4, 21-5 अशा फरकाने पाकिस्तानच्या महूर शहजाद व घझाला सिद्दीकी यांचा पराभव केला.

Back to top button