बुद्धिबळ खेळताना रोबोटने तोडले ७ वर्षाच्या मुलाचे बोट! | पुढारी

बुद्धिबळ खेळताना रोबोटने तोडले ७ वर्षाच्या मुलाचे बोट!

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियामध्ये खेळल्या जात असलेल्या मॉस्को बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलांची बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती. याचदरम्यान एका ७ वर्षाच्या मुलाला रोबोटने जखमी केले आहे. हा खेळ सुरू असताना मूलगा आपली चाल खेळत होता, त्याच वेळी रोबोट सुध्दा सक्रिय झाला, याच दरम्यान त्याने चाल खेळत असलेल्या मुलाचे बोट दाबले व त्याला जखमी केले.

वृत्तानुसार, मॉस्कोमध्ये १९ जुलै रोजी मॉस्को बुद्धिबळ ओपन स्पर्धेच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. या स्पर्धेत अनेक खेळाडू रोबोटसोबत बुद्धिबळ खेळत होते. यावेळी ७ वर्षांच्या मुलासमोर असलेल्या रोबोटने गेम सुरू असताना मुलाचे बोट पकडले व ते जोरात दाबले.

मुलाने ठरलेल्या वेळे आधीपासून चाल खेळायला सुरुवात केली. ज्यावेळी रोबोटची खेळण्याची पाळी होती. ज्यामध्ये रोबोटने मुलाचे बोट दाबले आहे. याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. बोट दाबल्यानंतर तो मुलगा जोरात रडत असल्याचे पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला वाचवण्यासाठी धावत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. त्या लहान मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले आहे की, जी घटना घडली आहे, ती दुर्दैवी आहे. खेळादरम्यान वापरण्यात आलेला रोबोट हा भाड्याने घेण्यात आला होता यात आमचा कोणताही दोष नाही आणि ही एक मशीनद्वारा घडलेली घटना आहे. मुलाच्या दुखापतीवर सांगितले की काळजी करण्यासारखे काही नाही. दुखापतीनंतरही तो खेळू शकतो.

या घटनेनंतर त्या मुलाच्या पालकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीर बनत चालले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे फेडरेशनकडून सांगण्यात येत आहे.

Back to top button