पुणे, पुढारी वृत्तसेवा: रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढले आहेत. यानुसार रिक्षा चालकांना आता दोन रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रिक्षा चालकांना ही भाडे वाढ येत्या १ ऑगस्ट या महिन्यापासून लागू करता येणार असून, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 2 रुपये अतिरिक्त आकारता येणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 1 रुपया आकारता येणार आहे. रिक्षा चालकांना पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी २१ रुपये भाडे आकारणी करता येत होती. तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते.
आता रिक्षा चालकांना पहिल्या एक किलोमीटर साठी 23 रुपये भाडे आकारता येणार आहे. तर त्या पुढील प्रत्येकी एक किलोमीटर साठी 15 रुपये आकारणे बंधनकारक राहणार आहे. दरम्यान सर्व रिक्षा चालकांनी ही भाडेवाढ लागू करण्यापूर्वी रिक्षा मीटर रि- कॅलिब्रेशन करून घ्यावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे. तसेच रिक्षा मीटर रि-कॅलेब्रेशन न करताच भाडेवाढ केली, तर संबंधित रिक्षा चालकांवर आरटीओकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.