England vs India 2nd T20I : इंग्लंडला ४९ धावांनी पराभूत करत भारताचा मालिका विजय | पुढारी

England vs India 2nd T20I : इंग्लंडला ४९ धावांनी पराभूत करत भारताचा मालिका विजय

एजबेस्टन; पुढारी ऑनलाईन : भारताने उभारलेल्या १७० धावांचा आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ भारताच्या (England vs India 2nd T20I) धारधार गोलंदाजी समोर अवघ्या १२१ धावांतच गारद झाला. भूवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल आणि हार्दिक पांड्या यांच्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशा: घुडघे टेकले. इंग्लंडच्या मोईन अली (२१ चेंडूत ३५ धावा) आणि डेव्हिड व्हेली ( २२ चेंडूत ३३ धावा) यांचा अपवाद वगळता एकही इंग्लंडच्या फलंदाजाने भारताच्या गोलंदाजीचा आत्मविश्वासाने सामना केला नाही. भूवनेश्वर कुमार याने ३, जसप्रीत बुमराह २, युजवेंद्र चहल २ आणि हर्षल पटेल व हार्दिक पांड्या यांनी १-१ बळी घेत इंग्लंडला सलग दुसऱ्या टी २० सामन्यात ४९ धावांनी पराभूत केले. या विजयाच्या बळावर भारताने मालिका विजय नोंदवला. या विजयासह कर्णधार रोहित शर्मा हा सलग १४ टी २० सामने जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार ठरला आहे.

भारताने (England vs India 2nd T20I) उभारलेल्या १७० धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला पहिल्या चेंडूवरच धक्का बसला. भूवनेश्वर कुमारने सलामीवीर जेसन रॉयला पहिल्याच चेंडूवर स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडून बाद केले. तसेच तिसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर पुन्हा भूवनेश्वर कुमारने कर्णधार जोस बटलरला (५ चेंडू ४ धावा) बाद केले. पुढे पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जसप्रीत बुमराह याने लिव्हींगस्टोनचा त्रिफळा उडवला (९ चेंडू १५ धावा). अशा प्रकारे पहिल्या पाच षटकात भारताने अवघ्या २७ धावांमध्ये इंग्लंडचे प्रमुख तीन फलंदाज बाद केले. यानंतर इंग्लंडला पुन्हा सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. मोईन अली आणि डेव्हिड व्हेली यांनी अनुक्रमे ३५ आणि ३३ धावांची खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला नाही.

डेव्हिड मलान (२५ चेंडूत १९ धावा), हेरी ब्रुक (९ चेंडूत ८ धावा), सॅम करण (४ चेंडूत २ धावा), ख्रिस जॉर्डन (१ चेंडूत १ धाव), रिचर्ड ग्लेसन (३ चेंडूत २ धावा), मॅथ्यु पार्किंसन (२ चेंडू ० धावा) या इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचीच कामगिरी बजावली. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पाचव्या कसोटी सामन्यात पराभव पत्करल्यानंतर टी २० मालिकेत (England vs India 2nd T20I) दमदार पुनरागमन केले. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली संघाने पहिले दोन्ही टी २० सामने जिंकले आहेत. अशा प्रकारे भारताने टी २० मालिका खिशात घातली आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून सलग १४ टी २० सामने जिंकले आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या पुनरागमनाने पुन्हा एका टीम इंडियाने विजय घोडदौड लगावली आहे.

तत्पुर्वी, कर्णधार रोहित शर्मा याच्या ३१ धावा, ऋषभ पंत याच्या २७ धावा आणि अखेरच्या षटकात रवींद जडेजाने नाबाद राहत केलेल्या २९ चेंडूत ४६ धावांच्या फटकेबाजीच्या बळावर भारताने इंग्लंड (England vs India 2nd T20I) समोर आठ गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावांचे आव्हान ठेवले होते. दुसऱ्या टी २० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याने भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. सलामीवीर रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी चांगली सुरुवात केली. पण, सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत ठरावीक अंतरात बळी घेत राहिले. अखेर जडेजाने केलेल्या अखेरच्या षटकातील फटकेबाजीमुळे भारत एक आव्हानात्मक धावसंख्या उभा करु शकला.

इंग्लंडचे (England vs India 2nd T20I) निमंत्रण स्विकारुन भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि रुषभ पंत यांनी पहिल्या चार षटकात इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरफूस समाचार घेतला. ताबडतोब फटकेबाजी करत रोहित शर्मा याने २० चेंडूत ३१ धावा केल्या. अखेर पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर रिचर्ड ग्लेसन याने शर्माला बाद केले. या खेळीत रोहित शर्माने २ षटकार आणि तीन चौकार लगावले. रोहित नंतर आलेल्या विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला तो केवळ १ धाव करुन पुन्हा ग्लेसनची शिकार ठरला. पुढील चेंडूवर पुन्हा ग्लेसनने पंतला बाद केले. पंतने १५ चेंडूत २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.


भारताच्या (England vs India 2nd T20I) पहिल्या तीन बळी नंतर मात्र इंग्लंडचे गोलंदाजांनी दबाव वाढवला व ठरावीक अंतरावर ते भारताचे बळी घेत राहिले. पंत नंतर सुर्यकुमार यादव (११ चेंडूत १५), हार्दिक पंड्या (१५ चेंडूत १२), दिनेश कार्तिक (१७ चेंडूत १२), हर्षल पटेल (६ चेंडूत १३) व भुवनेश्वर कुमार (४ चेंडूत २) ठरावीक अंतरावर बाद होत राहिले. एका क्षणी भारताची अवस्था ५ बाद ८९ अशी बिकट झाली होती. अखेरच्या षटकांमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाने तळातील फलंदाजांसोबत घेऊन आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. नाबाद खेळी करत जडेजाने २९ चेंडूत ४६ धावा केल्या.

इंग्लंडकडून गोलंदाज रिचर्ड ग्लेसन याने १५ धावा देत ३ बळी घेतले. तर ख्रिस जॉर्डन याने ४ बळी घेत भारताचा मध्यक्रमातील फळीच उध्वस्त केली. त्याने २७ धावा देत ४ बळी घेतले.

Back to top button