रोहित शर्मा याने मोडला कोहलीचा सर्वोत्कृष्ट T20 विक्रम | पुढारी

रोहित शर्मा याने मोडला कोहलीचा सर्वोत्कृष्ट T20 विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या T20 सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने संघाला वेगवान सुरुवात करून दिली आणि तो छोटी आणि दमदार खेळी खेळून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात पुनरागमन करताना कर्णधार रोहित शर्माने 16 चेंडूत 24 धावांची खेळी केली. या खेळीच्या मदतीने रोहित टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. हा आकडा गाठणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. कर्णधार म्हणून रोहितने विराट आणि धोनीला मागे टाकत सर्वात कमी डावात हा आकडा गाठला आहे.

कोहलीने 30 डावांमध्ये हा पराक्रम केला, मात्र रोहित शर्माने 29 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहली पहिल्या T20 सामन्यात संघाचा भाग नाही. त्याचबरोबर राेहित असा पराक्रम करणारा तो जगातील दहावा कर्णधार आहे.

रोहित शर्मा 28 व्या टी-20 सामन्यात भारताचे कर्णधार म्हणून मैदानात उतरला आहे. रोहितशिवाय महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून या फॉरमॅटमध्ये 72 सामन्यांत 1112 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली 50 सामन्यांमध्ये 1570 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून 65 सामन्यात कर्णधार असताना त्याने 1971 धावा केल्या आहेत. या प्रकरणात न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 56 सामन्यांमध्ये 1599 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर या बाबतीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या रोहित शर्माला पाचव्या कसोटी सामन्यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तो टीम इंडियासाठी कसोटी सामना खेळू शकला नाही या सामन्यात भारताला 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.

रोहितची टी20 कारकीर्द

रोहित शर्मा हा टीम इंडियाचा T20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 3313 धावा आहेत. रोहित शर्मानेही टी-20 क्रिकेटमध्ये 4 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे.

Back to top button