महेंद्रसिंह धोनी birthday : 'झीरो'ने सुरुवात केलेला माही झाला क्रिकेटचा 'हिरो'.... | पुढारी

महेंद्रसिंह धोनी birthday : 'झीरो'ने सुरुवात केलेला माही झाला क्रिकेटचा 'हिरो'....

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
भारतीय क्रिकेटच्‍या इतिहासातील सर्वात यशस्‍वी कर्णधार, अशी ओळख असणारा महेंद्रसिंह धोनी आज (दि. ७) ४१ वा वाढदिवस (महेंद्रसिंह धोनी birthday ) साजरा करत आहे. आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून त्‍याने निवृत्ती घेतली असली तरी जगातील सर्वात यशस्‍वी क्रिकेटपटू अशी त्‍याची ओळख आहे. त्‍याने ९० कसोटी, ३५० वन डे आणि ९८ टी-२० सामन्‍यांमध्‍ये भारताचे प्रतिनिधित्‍व केले. जाणून घेवूया, त्‍याच्‍या क्रिकेट करिअरमधील काही अविस्‍मरणीय गोष्‍टी…

महेंद्रसिंह धोनी birthday :  आंतराष्‍ट्रीय क्रिकेटमधील सुरुवात झाली होती ‘डक’ने

धोनी याने आपल्‍या क्रीडा क्षेत्रातील सुरुवात फुटबॉल गोलकीपर म्‍हणून केली होती. काही काळ त्‍याने भारतीय रेल्‍वेमध्‍ये टीसी म्‍हणून काम केले. त्‍याच्‍या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात ‘डक’ने म्‍हणजे तो पहिल्‍याच सामन्‍यात शून्‍यवर बाद झाला होता.

यष्‍टीरक्षक म्‍हणून सर्वोच्‍च धावसंख्‍या

२००७मध्‍ये एफो-आशियाई सामन्‍यात त्‍याने महेला जयवर्धनसोबत २१८ धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी सहाव्‍या विकेटसाठी विक्रमी ठरली होती. धोनीने २००५ मध्‍ये श्रीलंकेविरुद्‍ध नाबाद १८३ धावा केल्‍या होत्‍या. यष्‍टीरक्षकाने केलेली ही सर्वोच्‍च धावसंख्‍या ठरली. याच सामन्‍यात त्‍याने वन डेमध्‍ये सर्वाधिक १० षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

तिन्‍ही ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार

टी-२० विश्‍वचषक जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला. २००७ मधील विश्‍वचषक स्‍पर्धेतील रोमहर्षक सामन्‍यात भारताने पाकिस्‍तानचा पराभव केला होता. सौरव गांगुली कर्णधार असताना महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियात पदार्पण केले होते. यानंतर त्‍याने राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि विराट कोहलीच्‍या नेतृत्त्‍वाखालील संघात तो खेळला. आसीसीच्‍या तिन्‍ही ट्रॉफी जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.

आयपीएलमधील १० अंतिम सामने खेळणारा क्रिकेटपटू

चेन्‍नई सुपर किंग्‍ज संघाचे नेतृत्त्‍व करणार्‍या धोनीने आयपीएल स्‍पर्धा जिंकली. विशेष म्‍हणजे त्‍याने आयपीएलच्‍या १० अंतिम सामने खेळले. यातील ९ चेन्‍नई सुपर किंग्‍जसाठी तर एक रायझिंग पुणे संघासाठी खेळला. आयपीएलमधील सर्वात यशस्‍वी कर्णधार अशीही त्‍याचे ओळख आहे. त्‍याने चेन्‍नई संघाला चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिले आहे.

महेंद्रसिंह धोनी birthday : एक षटक, एक बळीही!

२००९ मधील चॅम्‍पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये धोनीने गोलंदाजी केली. त्‍याने केवळ एक षटक गोलंदाजी केली. यामध्‍ये त्‍याने ट्रव्‍हिस डॉवलिन याच विेकट घेतली होती.

 रणजी ट्रॉफीपासून वंचित

२००९ मध्‍ये धोनी याने न्‍यूझीलंडमधील कसोटी मालिका जिंकली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला होता. मात्र आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये मोठे यश मिळणारा धोनी हा रणजी ट्रॉफीच्‍या विजयापासून वंचित राहिला आहे.

पाचव्‍या किंवा सातव्‍या स्‍थानावर फलंदाजी करुनही आठ हजार धावा

धोनी हा आपल्‍या कारकीर्दीत वन डेसामन्‍यात पाचव्‍या किंवा सातव्‍या स्‍थानावर खेळायला येत असे. तरी त्‍याने आठ हजारहून अधिक धावा केल्‍या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

टी-२० विश्‍वचषकांमध्‍ये ३० पेक्षा अधिक सामन्‍यांमध्‍ये  नेतृत्त्‍व

टी-२० विश्‍वचषक सामन्‍यात तब्‍बल ३० पेक्षा अधिक सामन्‍यात धोनीने भारताचे नेतृत्‍व केले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच २०० वन डे सामन्‍याचे नेतृत्‍व त्‍याने केले. २०१० आणि २०१६मधील आशिया चषक स्‍पर्धेत तो कर्णधार होता. मात्र २०१६ आशिया चषक स्‍पर्धेवेळी त्‍याने कर्णधारपद सोडले होते.

३०० कोटी रुपयांची ब्रँड व्‍हॅल्‍यू असणारा खेळाडू

वन डेमध्‍ये १०० हून अधिक यष्‍टीचीत करणारा तो एकमेव यष्‍टीरक्षक ठरला आहे. त्‍याने ३३२ वन डे सामने खेळले असून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा खेळाडू अशीही त्‍याची ओळख आहे. तसेच त्‍यावेळी ३०० कोटी रुपयांची ब्रँड व्‍हॅल्‍यू असणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

सलग सहा कसोटी जिंकणार कर्णधार

आयपीएलमध्‍ये त्‍याने कर्णधार म्‍हणून १०० पेक्षा अधिक सामने जिंकले आहे. २०१३ मध्‍ये धोनीच्‍या नेतृत्त्‍वाखालील संघाने सलग सहा कसोटी सामने जिंकले होते. तो एक नवा विक्रम ठरला होता. ३० जून २०१७ रोजी त्‍याने वन डे सामन्‍यांमध्‍ये एकुण २०० षटकार ठोकरण्‍याचा विक्रमाला गवसणी घातली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला होता.

विविध पुरस्‍कारांनी कामगिरीचा गौरव

२००८, २००९ मध्‍ये आसीसीच्‍या वन डेमधील सर्वोत्‍कृष्‍ट खेळाडू होण्‍याचा बहुमान धोनीने मिळवला. २००७ मध्‍ये राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्‍काराने त्‍याचा गौरव करण्‍यात आला होता. २००९ मध्‍ये त्‍याला पद्मश्री तर २०१८ मध्‍ये पद्म भूषण पुरस्काराने त्‍याच्‍या कामगिरीचा गौरव भारत सरकारने केला होता.

‘डक’ने सुरुवात ‘डक’नेच आतंरराष्‍ट्रीय क्रिकेटला अलविदा

जानेवारी २०१९ मध्‍ये त्‍याने दहा हजार धावांचा टप्‍पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला.योगायोग असा की, धोनीच्‍या क्रिकेट करीअरची सुरुवात रन आउटने झाली. तर २०१९ मधील अखेरच्‍या वन डे सामन्‍यातही तो रन आउट झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh (@sakshisingh_r)

 

 

Back to top button