भारतासमोर विजयाचे टार्गेट, इंग्लंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना | पुढारी

भारतासमोर विजयाचे टार्गेट, इंग्लंडविरुद्ध आज पहिला टी-20 सामना

साऊथम्टन : वृत्तसंस्था हिट मॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या (गुरुवार) साऊथम्टनमधील रोझ बाऊल स्टेडियमवर रंगणार आहे. पाचव्या कसोटी सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने टीम इंडिया उद्या मैदानात उतरणार आहे. मात्र, यासाठी भारतीय संघाला सर्व आघाड्यार इंग्लंडपेक्षा सरस कामगिरी करावी लागणार आहे.

कोरोनामुळे गतसाली खेळविण्यात न आलेल्या व नुकत्याच झालेल्या पाचव्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली. कोरोना संसर्ग झाल्याने या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. यामुळे संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सांभाळले होते. पहिल्या टी-20 सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय कोहलीही संघात नसेल. ईशान किशन अथवा ऋतुराज गायकवाड यापैकी एका फलंदाजाला रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर विकेटकिपरची जबाबदारी दिनेश कार्तिक पार पाडणार आहे. ऋषभ पंतला पहिल्या टी-20 साठी विश्रांती देण्यात आली आहे.

9 यजमान इंग्लंडने रोझ बाऊलवर आतापर्यंत 9 सामने खेळताना 6 मिळविले आहेत. तर 3 सामन्यात पराभव पत्करला आहे. 5 भारताने रोझ बाऊलवर आजपर्यंत एकही टी 20 सामना खेळलेला नाही. मात्र, पाच एकदिवशीय सामने खेळताना 3 विजय मिळविले आहेत. तर दोन सामने गमावले आहेत.

हेड टू हेड
एकूण सामने : 19
भारत विजयी : 10
इंग्लंड विजयी : 09
 

संघ यातून निवडणार :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सैमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रुक, सॅम करण, रिचर्ड ग्लेसन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किन्सन, जेसन रॉय, फिल साल्ट, रिस टॉप्ले, डेविड विले.

हेही वाचा

Back to top button