‘एमपीएससी’ वर्णनात्मक हवी; अभ्यास गटाची शिफारस | पुढारी

‘एमपीएससी’ वर्णनात्मक हवी; अभ्यास गटाची शिफारस

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘शासकीय अधिकारी म्हणून काम करताना ज्या गरजा आहेत, त्यानुसार वैकल्पिक परीक्षेतून त्याची गुणवत्ता सिद्ध होत नव्हती. आकलन क्षमता, निर्णय क्षमता, विषय समज, समस्यांचे आकलन, विषयाचे ज्ञान, संवाद शैली, बुद्धिमत्ता, प्रगल्भता यासाठी वर्णनात्मक स्वरूप परीक्षा आवश्यक आहे,’ अशी शिफारस सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या त्रिसदस्यीय समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सेवानिवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे उपस्थित होते. राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा अभ्यास करून लोकसेवा आयोगाला शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने दळवी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय अभ्यास गट गठित केला होता. या गटाने केलेल्या शिफारशी राज्य लोकसेवा आयोगाने स्वीकारल्या असून, नव्या शिफारशी काय आहेत, त्यांचे स्वरूप कसे आहे, याबाबत दळवी यांनी माहिती दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत पारदर्शकता असावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुसार उमेदवारांचे पेपर स्कॅन करून दोन तज्ज्ञांकडून पेपर तपासणी करण्यात यावी, अशी शिफारस आम्ही केली. ठराविक वेळेत पेपर तपासणी करून निकाल लवकर लावण्याबाबत ही सूचित करण्यात आली आहे. वैकल्पिक परीक्षेऐवजी वर्णनात्मक परीक्षा घेण्यासाठी आगामी दीड वर्षाचा कालावधी पुरेसा आहे. मात्र, हा बदल 2024 पासून करावा ही विद्यार्थ्यांची मागणी आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली.

26 राज्यांतील परीक्षांचा अभ्यास
राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांचा एकत्रित परीक्षा पद्धत अभ्यासली आहे. त्यासाठी देशातील 26 राज्यांतील लोकसेवा आयोग परीक्षांचा अभ्यास करण्यात आला. पूर्वपरीक्षा आत्तापर्यंत सत्राचे दोन पेपर घेण्यात येत होते. सी सॅट पेपर हा मेरिटसाठी धरण्याऐवजी तो केवळ पात्रतेसाठी ठेवण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांची होती.

 

Back to top button