SA vs IND : दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा विजय

SA vs IND
SA vs IND
Published on
Updated on

कटक : वृत्तसंस्था टिच्चून गोलंदाजी आणि भक्‍कम फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताचा 4 विकेट्सनी पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेतील भारताचा हा दुसरा पराभव असून, पाहुण्या संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना आता मंगळवारी (14 जून) होणार आहे. या सामन्यात भारताला 20 षटकांत फक्‍त 6 बाद 148 धावा करता आल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकन संघाने हे आव्हान 18.2 षटकांत 10 चेंडू शिल्‍लक ठेवून पूर्ण केले. हेन्‍रीक क्‍लासेन याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

 भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना भुवनेश्‍वरकुमारने सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के दिले. त्याने रिझा हेन्‍रिक्स (4), ड्वेन प्रिटोरियस (4) आणि रॅसी वॅन डेर ड्युसेन (1) यांना पॉवरप्लेमध्येच बाद केले. त्यामुळे त्यांची अवस्था 3 बाद 29 अशी झाली. यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा आणि हेन्‍रिक क्‍लासेन यांनी डाव सावरत 36 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. तेराव्या षटकांत ही जोडी फुटली. चहलने बवुमाला (35) बाद केले; पण क्‍लासेनची क्‍लासिक खेळी सुरूच होती. त्याने 32 चेंडूंतच अर्धशतक गाठले. जोडीला मिलर होताच, त्यामुळे दोन्ही बाजूने धावा येत होत्या. दोघांची 26 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी झाली. दोघांनी संघाला विजयाजवळ आणले. पाच धावांची आवश्यकता असताना हर्षल पटेलने क्‍लासेनला बाद केले. त्याने 46 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 81 धावा केल्या. त्याच्या जागी आलेला वेन पार्नेलही एका धावेवर परतला. शेवटी मिलरने विजयी धावा घेतल्या. तो 20 धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरला तर दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन बदल करण्यात आले. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने 4 चेंडूंचा सामना केला आणि केवळ 1 धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला; पण ईशान किशनने पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात धुवाँधार फलंदाजी केली अन् 21 चेंडूंत 34 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत खराब शॉट खेळून आऊट झाला. जेव्हा संघाला त्याच्याकडून खेळण्याची अपेक्षा होती, त्याचवेळी त्याने आपली विकेट गमावली. 7 चेंडूंत 5 धावा करून पंत बाद झाला.

हार्दिक पंड्याला या सामन्यात सूर गवसला नाही. टेम्बा बवुमाने त्याला जीवदान दिल्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याची (9) दांडी उडाली. पुढच्या षटकांत सेट झालेला श्रेयस अय्यर बाद झाला. त्याने 40 धावा केल्या. यामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. अक्षर पटेल (10) याला नोर्त्जेने त्रिफळाचित केले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी शेवटच्या तीन षटकांत 36 धावांची भागीदारी केल्यामुळे भारताला 6 बाद 148 धावांची मजल मारता आली. कार्तिक 30 (चेेंडू) तर हर्षल 12 धावांवर नाबाद राहिला.

भारत : 20 षटकांत 6 बाद 148 धावा. (श्रेयस अय्यर 40, ईशान किशन 34, दिनेश कार्तिक 30. अ‍ॅन्‍रिच नोर्त्जे 2/36)
दक्षिण आफ्रिका : 18.2 षटकांत 6 बाद 149 धावा. (हेन्रिक क्‍लासेन 81, बवुमा 35. भुवनेश्‍वर कुमार 4/13)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news