

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) अनेक अर्थाने खास होता. पंतने प्रथमच भारतीय संघाची धुरा सांभाळली. यासोबतच त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. दिल्लीच्या मैदानावर नाणेफेक करण्यासाठी येताना पंतने धोनीचा विक्रम मोडला आणि भारताचा दुसरा सर्वात तरुण T20 कर्णधार बनला. या बाबतीत सुरेश रैना पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, दुसरीकडे त्या सामन्यात पंतच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंवला गेला. कर्णधार म्हणून पहिल्याच T20 सामन्यात पराभवाची चव चाखणारा तो विराट कोहलीनंतर भारताचा दुसरा कर्णधार ठरला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर सात गडी राखून मात केली. कर्णधार म्हणून पंतचा (Rishabh Pant) पहिला सामना विराट कोहली सारखाच होता. त्याने विराटसारख्याच धावा केल्या आणि त्याच फरकाने त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
ऋषभ पंतने (Rishabh Pant) 24 वर्षे 248 दिवस वय असताना भारताच्या T20 संघाचे नेतृत्व केले. सुरेश रैना नंतर तो दुसरा सर्वात तरुण कर्णधार बनला. सुरेश रैनाने वयाच्या 23 वर्षे 197 दिवसांत भारताचे नेतृत्व केले. तर, महेंद्रसिंग धोनी जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार झाला तेव्हा त्याचे वय 26 वर्षे 66 दिवस होते. अशा प्रकारे पंतने धोनीचा विक्रम मोडला, पण तो भारताला विजय मिळवून देता आला नाही.
या सामन्यात ऋषभ पंतने (Rishabh Pant) विराट कोहलीच्या लाजिरवाण्या विक्रमाची बरोबरी केली. विराट कोहली हा पहिला भारतीय होता ज्याला कर्णधार म्हणून पहिल्या T20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता पंतही या यादीत सामील झाला आहे. या दोघांशिवाय इतर सर्व भारतीय कर्णधारांनी त्यांचा पहिला T20 सामना जिंकला आहे. विराटने 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा भारताच्या T20 संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि कानपूरमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताचा सात गडी राखून पराभव केला होता.
पंतचा T20 मधील पहिला सामना विराट कोहलीच्या प्रदर्शनासारखाच राहिला. दोघांना कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात सात विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. तर पहिल्या सामन्यात दोघांनीही 29 धावा केल्या.